अमेरिकेने टाळ्या वाजविल्यावर भारताने विवेकांनद स्वीकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:31 PM2018-01-12T22:31:34+5:302018-01-12T22:33:35+5:30
भारतावर कायम पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे. हेच कारण आहे की स्वामी विवेकांनद या भारतीय प्रज्ञावंतालाही भारताने तेव्हाच स्वीकारले जेव्हा अमेरिकेने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विद्वतेचा सन्मान केला, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतावर कायम पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे. हेच कारण आहे की स्वामी विवेकांनद या भारतीय प्रज्ञावंतालाही भारताने तेव्हाच स्वीकारले जेव्हा अमेरिकेने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विद्वतेचा सन्मान केला, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले. खासदार महोत्सवात शुक्रवारी युवादिनी आयोजित ‘स्वामी विवेकांनद’ या विषयावर ते व्याख्यान देत होते. कानिटकर पुढे म्हणाले, शिकागोच्या सर्वधर्म सभेत स्वामी विवेकानंदानी पहिल्यांदा बंधू-भगिनींनो म्हटले म्हणून त्यांचे भाषण गाजले असे सांगितले जाते. परंतु ते खोटे आहे. विवेकानंदाच्याही बºयाच आधी तीन व्यक्तींनी बंधू-भगिनींनो उच्चारले होते. शिकागोची ती सभा विवेकानंदांनी जिंकली याचे कारण वेगळे होते. ते जेव्हा दीड महिन्याचा सागरी प्रवास करून अमेरिकेत पोहोचले तेव्हा चोराने त्यांची बॅग पळवली. पुढचे अनेक दिवस त्यांनी संन्यासाच्या एका कपड्यावर अमेरिकेत भिक्षा मागत दिवस काढले. परंतु या देशात इतकी उपेक्षा सहन करूनही जेव्हा त्यांनी शिकागोच्या सभेत अमेरिकावासीयांना बंधू-भगिनींनो संबोधले तेव्हा तेथील लोकांना त्यांच्या मनाचा मोठेपणा कळला आणि पुढे अवघी अमेरिका त्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी वैचारिकदृष्ट्या समृद्ध होत गेली. विवेकानंदांनी जगाला विज्ञानवाद दिला. त्यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याही अनेक गोष्टी ते तर्काच्या कसोटीवर पडताळल्याशिवाय स्वीकारत नव्हते. यासाठी त्यांनी अनेकदा गुुरुंची परीक्षा घेतली. म्हणूनच आज १५० वर्षानंतरही समाज विवेकानंदांचे स्मरण करतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. व्याख्यानाच्या प्रारंभी खा. अजय संचेती, आ. अनिल सोले, आ. नागो गाणार, राजेश लोया, विजय सालंगकर, डॉ. उपेंद्र कोठेकर व कैलाश चुटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.