कोरोनानंतर ८ टक्के रुग्णांना ‘लंग ट्रान्सप्लांट’ची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:20 PM2020-12-21T12:20:53+5:302020-12-21T12:34:38+5:30
Nagpur News Corona कोरोनाच्या उपचाराचा कालावधी पूर्ण करून घरी गेलेल्या काही रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा आजार बळावत असल्याचे दिसून येत आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या उपचाराचा कालावधी पूर्ण करून घरी गेलेल्या काही रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा आजार बळावत असल्याचे दिसून येत आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘पल्मनरी मेडिसीनच्या पोस्ट कोविड’ विभागात मागील तीन महिन्यात कोरोनावर मात केलेले ४३९ रुग्ण उपचारासाठी आले. यातील १६ टक्के रुग्णांना ‘लंग फायब्रोसिस’ असल्याचे निदान झाले. धक्कादायक म्हणजे, यातील ८ टक्के रुग्णांना अतिगंभीर स्वरूपाचा ‘लंग फायब्रोसिस’ झाला आहे. ते कृत्रिम ऑक्सिजनवर आहेत. त्यांच्याकडे फुफ्फुस प्रत्यारोपण म्हणजे ‘लंग ट्रान्सप्लांट’शिवाय पर्याय नाही.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला नागपूर जिल्ह्यात नऊ महिन्याचा कालावधी झाला आहे. या दरम्यान १,१९,२२१ कोरोनाबाधित आढळून आले. पोस्ट कोविडनंतर रुग्णांमध्ये विविध आजाराची लक्षणे दिसून येतात. त्यांच्यावरील उपचारासाठी मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘पल्मनरी मेडिसीन’ विभागात ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरू करण्यात आली. सप्टेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत ४३९ रुग्ण उपचारासाठी आले. यात २४३ पुरुष तर १९६ महिलांचा समावेश आहे. यातील १६.६२ टक्के म्हणजे, ७३ रुग्णांना ‘लंग फायब्रोसिस’ असल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे, या रुग्णांमधून ६ रुग्णांना म्हणजे, ८.२१ टक्के रुग्णांना तीव्र स्वरूपाचा ‘लंग फायब्रोसिस’ झाल्याचे पुढे आले. हे सर्व रुग्ण कृत्रिम ऑक्सिजनवर आहेत. या रुग्णांवर कायम उपचारासाठी ‘लंग ट्रान्सप्लांट’शिवाय पर्याय नाही, अशी माहिती मेडिकलच्या पल्मनरी विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.
-काय आहे ‘फायब्रोसिस’
डॉ. मेश्राम म्हणाले, फुफ्फुसाच्या त्रासाला वैद्यकीय भाषेत ‘लंग इन्फेक्शन फायब्रोसिस’ म्हणतात. यात कोरोनाची लागण झाल्यावर फुफ्फुसात संसर्ग होतो. उपचारानंतर या संसर्गाचे व्रण राहतात. यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते. रुग्णाला धाप लागते. तीव्र स्वरूपाच्या लंग फायब्रोसिसचा प्रभाव हृदयावर पडतो. हृदय कमजोर होऊ शकते.
- पन्नाशीमध्ये दिसणारा फायब्रोसिस, कोरोनामुळे ३६ व्या वयात
डॉ. मेश्राम म्हणाले, लंग फायब्रोसिस हा वयाच्या पन्नाशीनंतर होणारा आजार आहे. परंतु कोरोनामुळे तरुण वयोगटातही हा आजार दिसून येत आहे. विभागात लंग फायब्रोसिसचे ३६ ते ६५ वयोगटातील रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, न्यूमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब व अस्थमा असलेल्या रुग्णांनी कोविडला हरविले आहे. त्यांनी ‘लंग फायब्रोसिस’ला गंभीरतेने घ्यायला हवे.
- फायब्रोसिसचा थेट परिणाम जीवनाच्या गुणवत्तेवर
लंग फायब्रोसिसचे अनेक टप्पे आणि प्रकार आहेत. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे जीवनाची गुणवत्ता आणि कालावधीवर थेट परिणाम होतो. यामुळे कोरोना होणारच नाही याची काळजी घ्यावी. झाल्यास कोरोनानंतर फुफ्फुसांची तपासणी करून घेणे, लक्षणांवर लक्ष ठेवणे व उपचार करणे अतिशय आवश्यक आहे.
-डॉ. सुशांत मेश्राम
विभागप्रमुख, पल्मनरी मेडिसीन, मेडिकल