गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १६ तासात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 10:18 AM2018-06-16T10:18:07+5:302018-06-16T10:18:16+5:30

गुन्ह्याची तक्रार मिळाल्याच्या तीन तासात आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध अवघ्या १६ तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रशंसनीय कामगिरी सीताबर्डी पोलिसांनी बजावली आहे.

After the crime happened, within 16 hours charge sheet filed in the court | गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १६ तासात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १६ तासात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Next
ठळक मुद्देपोक्सो कायदा : विनयभंग, मारहाणीचे प्रकरणकोर्टात आरोपीसह दोषारोपपत्रही सादरसीताबर्डी पोलिसांची कारवाई

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्ह्याची तक्रार मिळाल्याच्या तीन तासात आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध अवघ्या १६ तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रशंसनीय कामगिरी सीताबर्डी पोलिसांनी बजावली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भक्कम साक्षीपुराव्यासह अवघ्या १६ तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना ठरावी.
महिला-मुलींवरील अत्याचारातील गुन्हे देशभरात वाढतच आहे. कडक कायदे करूनही हे गुन्हे कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे. महिला-मुलींवरील अत्याचाराच्या संदर्भात केंद्राने नुकताच शिक्षेबाबत नवीन निर्णय घेतला आहे. खासकरून बालअत्याचार रोखण्यासाठी पोक्सो कायदाही अधिक कडक केला आहे. मात्र, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे गुन्हे सुरूच आहे. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपुरातही अशा प्रकारचे गुन्हे सातत्याने घडतच आहेत. विशेष म्हणजे, बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा घडल्यानंतर त्याची तक्रार दाखल करण्यापासून तो आरोपीला अटक करण्यापर्यंतच्या कालावधीत बरेचदा पोलिसांकडून ‘टाइमपास’ केला जातो. त्यामुळे अनेकदा पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेतला जातो आणि संतापही व्यक्त केला जातो. या पार्श्वभूमीवर, युवतीचा विनयभंग करून तिच्या वडिलांना भररस्त्यावर मारहाण करण्याच्या गुन्ह्यात सीताबर्डी पोलिसांनी दाखविलेली तत्परता कौतुकास्पदच नव्हे तर आदर्शही ठरावी.
प्रकरण आहे रामदासपेठेतील. नुकतीच दहावी पास झालेली १६ वर्षीय युवती गुरुवारी सायंकाळी ५ वाजता रामदासपेठेतील आपल्या घरून ड्रार्इंग क्लासमध्ये जायला निघाली. वस्तीतीलच आरोपी सुरेंद्र पालसिंग आनंद (वय २८) हा तिच्या मागून स्कुटरवर आला. त्याने तिच्याजवळ स्कुटर थांबवून तिला अभद्र टोमणा मारला. एवढेच नव्हे तर तिचा हात पकडून जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. युवतीने आरोपीच्या हाताला झटका दिला आणि ती लेंड्रापार्ककडे निघाली. आरोपी तिचा पाठलाग करू लागला. त्यामुळे तिने आपल्या मोबाईलवरून वडिलांना माहिती दिली अन् मदतीला बोलविले. ते ऐकून, आरोपी सुरेंद्रने तिला अश्लील शिवीगाळ केली.
घरापासून काही अंतरावरच ही घटना घडल्यामुळे मुलीचे वडील लगेच घटनास्थळी पोहचले. त्यांनी आरोपीला हटकले असता त्याने त्यांना मारहाण केली. ते पाहून युवतीच्या वडिलांचे दोन मित्र मदतीला धावले. परिणामी आरोपी पळून गेला. या घटनेमुळे मानसिक धक्का बसलेल्या युवतीच्या वडिलांनी बदनामीच्या धाकाने पोलीस ठाण्यात जाण्यासाठी बराच विचारविमर्श केला. त्यानंतर रात्री ८ वाजता सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी सहायक पोलीस निरीक्षक छाया येलकेवार यांच्याकडून मुलीला अश्लील शिवीगाळ करून आणि तिचा हात पकडून विनयभंग केल्याच्या आरोपाखाली दुहेरी विनयभंगाचे कलम (३५४ अ तसेच ड), रस्त्यात अडवून मारहाण करणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपाखाली कलम ५०४, ५०६, ३४१ आणि भादंवि तसेच पोक्सो कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेऊन त्याला रात्री ११ वाजता अटक करण्यात आली. या प्रकरणात आरोपीविरोधात प्रत्यक्ष घटनास्थळी असलेले अनेक साक्षीदार मिळाल्याने पोलिसांनी त्यांचे रात्रीच बयाण नोंदवून घेतले. रात्रभरात या प्रकरणाचे दोषारोपपत्र तयार करण्यात आले. पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी ते तपासून घेतल्यानंतर शुक्रवारी दुपारी ३ वाजता आरोपीला कोर्टात हजर करण्यासोबतच त्याच्याविरोधात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले. सीताबर्डी पोलिसांची ही तत्परता पोलीस दलात चर्चेला विषय ठरली आहे.

उपराजधानीतील वास्तव
नागपुरात २०१७ मध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात विनयभंगाचे ९९ आणि बलात्काराचे ४२ गुन्हे घडले होते. यावर्षी या तीन महिन्यात विनयभंगाचे ८६ आणि बलात्काराचे २८ गुन्हे घडले आहेत. एप्रिल ते जून या कालावधीची आकडेवारी अद्याप उपलब्ध व्हायची आहे. मात्र, ती देखिल कमीजास्त एवढीच असावी, अशी सूत्रांची माहिती आहे. गेल्या दोन महिन्यात ३ चिमुकल्यांसह ७ अल्पयीन मुलींवर बलात्कार झाल्याची नोंद असून, पोलीस त्या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र सादर करण्याच्या तयारीत आहेत.

Web Title: After the crime happened, within 16 hours charge sheet filed in the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा