पोलीस जीपला धडक देऊन उलटलेल्या ट्रकमधून ६.५० लाखाचे सामान लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 11:46 PM2019-01-09T23:46:20+5:302019-01-09T23:50:52+5:30
बेलतरोडी पोलीस ठाण्यातील वाहनाला धडक दिल्यानंतर पलटलेल्या ट्रकमधून साडे सहा लाख रुपयाचे सामान चोरीला गेले. या घटनेमुळे बेलतरोडी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्यातील वाहनाला धडक दिल्यानंतर पलटलेल्या ट्रकमधून साडे सहा लाख रुपयाचे सामान चोरीला गेले. या घटनेमुळे बेलतरोडी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री वर्धा रोडवरील परसोडी येथे बेलतरोडी पोलीस ठाण्यातील जीप क्रमांक एमएच/ ३१/ एजी/ ९९१४ ला ट्रक क्रमांक एमएच २७/ एक्स/७३८६ ने धडक दिली होती. पोलीस जीपला धडक दिल्यानंतर ट्रक पलटला होता. या धडकेमुळे ठाणेदार विजय तलवारे, त्यांचा रायटर गंथाडे आणि जीप चालक सुखदेव वटाणे जखमी झाले होते. बेलतरोडी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून ट्रक चालक मनोहर भाऊराव पाचे (४९) रा. दत्तवाडी याला अटक केली होती.
अपघातानंतर ट्रक रस्त्यावरच पडून होता. ट्रकमध्ये हेयर आईल, चहापत्ती, चॉकलेट, फॅन, गिझरह इतर साडे सहा लाखाच्या वस्तू ठेवल्या होत्या. अज्ञआत आरोपींनी त्या वस्तू चोरून नेल्या. ते सामान वर्धा येथील योगेश जयस्वाल यांच्या मालकीचे होते. चोरीचा प्रकार उघडकीस येताच जयस्वाल यांनी बेलतरोडी पोलिसात गुन्हा दाखल केला. अपघतानंतर ट्रकला हटविण्याची जबाबदारी पोलिसांसह ट्रक मालकाचीही होती. परंतु कुणीही ट्रक हटविण्याची व्यवस्था केली नाही. तसेच ट्रकमध्ये किमती वस्तू असतानाही त्याच्या देखरेखेचीही व्यवस्था करायला हवी होती. ती सुद्धा झाली नाही.