मृत्यूनंतरही अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरला अमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:25 AM2017-11-03T01:25:57+5:302017-11-03T01:26:09+5:30
अनंतनगर येथील रहिवासी अमित अवस्थी यांना डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केल्यानंतर अमितच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनंतनगर येथील रहिवासी अमित अवस्थी यांना डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केल्यानंतर अमितच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. अमितचे हृदय ज्या व्यक्तीच्या शरीरात ट्रान्सप्लॅण्ट करण्यात आले त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबांनी सुद्धा अवयवदानाचा संकल्प केला. मृत्यूनंतरही अमित अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.
अवस्थी कुटुंबामुळे आंतरराज्यीय स्तरावर पहिल्यांदा हृदयाचे प्रत्यारोपण होऊ शकले. ब्रेनडेड झालेले अमित (४०) यांचे हृदय मेरठ येथील प्रभातनगरमध्ये राहणाºया रवी कोहली यांच्या शरीरात प्रत्यारोपण सोमवारी यशस्वीरीत्या प्रत्यारोपित करण्यात आले आणि रवि कोहली यांना पुन्हा जीवनदान मिळाले. अमितचे वडील विनोद अवस्थी व आई रत्नावली अवस्थी व त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा संकल्प केल्यानंतर सोमवारी सकाळी ८.३० वाजता अमितचे आॅपरेशन करण्यात आले. वोक्हार्टचे डॉ. समीर पाठक, नवी दिल्ली एम्सचे डॉ. मिलिंद होटे, डॉ. अवंतिका जायस्वाल यांना यश आले.
सात जणांनी केला अवयवदानाचा संकल्प
मेरठ येथे राहणाºया रविच्या कुटुंबातील सात लोकांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे. त्याचबरोबर लोकांना अवयवदान करण्यास प्रेरित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. अवयवदानामुळे गरजवंत व्यक्तीला जीवनदान मिळू शकते.