जीव गेल्यानंतरच प्रशासनाला का येते जाग?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:52 PM2018-03-13T13:52:36+5:302018-03-13T13:52:48+5:30
इंद्रप्रस्थनगरातील साधना शशिकांत पुराडभट यांचा रविवारी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण होते ते किरकोळ अपघात. परंतु या अपघातामागचे खरे कारण होते ते प्रशासनाचा निष्काळजीपणा. त्यांचा जीव गेला आणि प्रशासनाने लगेचच त्या रस्त्याची डागडुजी केली. याचा अर्थ प्रशासनाला जीव गेल्यानंतरच जाग येते का, असा प्रश्न नागपूरकरांनी उपस्थित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंद्रप्रस्थनगरातील साधना शशिकांत पुराडभट यांचा रविवारी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण होते ते किरकोळ अपघात. परंतु या अपघातामागचे खरे कारण होते ते प्रशासनाचा निष्काळजीपणा. त्यांचा जीव गेला आणि प्रशासनाने लगेचच त्या रस्त्याची डागडुजी केली. याचा अर्थ प्रशासनाला जीव गेल्यानंतरच जाग येते का, असा प्रश्न नागपूरकरांनी उपस्थित केला आहे.
घरातील चालतीफिरती आणि करती व्यक्ती अशी अचानक निघून गेल्याने त्या कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले आहे. माझ्या आईच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल त्यांच्या मुलीने प्रशासनाला केला आहे.
आकाशवाणी चौक ते जीपीओ चौकादरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी काही झाडे कापण्यात आली होती. रस्ता समतोल न करता, झाडाचे बुंधे तसेच ठेवण्यात आले होते.
त्यामुळे झाडाचा कापलेला भाग उंचवट्यासारखा झाला होता. या रस्त्यावर जवळपास तीन ठिकाणी हा प्रकार दिसून आला. ४ मार्चला इंद्रप्रस्थनगर येथील रहिवासी साधना पुराडभड या आपल्या पतीसोबत रात्री ९ वाजताच्या सुमारास दुचाकीने आकाशवाणी चौकाकडून येत होत्या. त्यांची गाडी या उंचवट्यावरून गेली. गाडीचा बॅलेंस बिघडल्याने दोघेही पडले. यात साधना यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यांना लागलीच शुअरटेक हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. आठवडाभर त्यांच्यावर उपचार करण्यात आला. परंतु त्या प्रतिसाद देऊ शकल्या नाही आणि रविवार, ११ मार्चला सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांची मुलगी मधुरा पुराडभट यांनी आईच्या मृत्यूला कारण ठरलेल्या त्या रस्त्याचे फोटो घेतले. हे सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पोस्ट केले. त्यांना आईसोबत झालेल्या घटनेची माहिती दिली. त्याच्या दोन दिवसानंतर त्यांनी मनपाचे आयुक्त अश्विन मुदगल यांची भेट घेऊन, हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मला ते फोटो पाठविले आहे असे सांगून रस्त्याचे काम लवकरच होईल, असे आश्वासन मुदगल यांनी दिले. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर आज तो उंचवटा समतोल करण्यात आला. पण पूर्वीच मनपा प्रशासनाने याची दखल घेतली असती, तर आज साधना यांचा जीव गेला नसता, पुराडभट कुटुंबावर दु:खाचे सावट कोसळले नसते.
यामागे दोष कुणाचा ?
दोन वर्षांपासून हा उंचवटा रस्त्यावर आहे. मनपाच्या मुख्यालयाजवळून अगदी १०० मीटरच्या आत, जिल्हा सत्र न्यायालयाच्या अगदी समोर हे अपघातप्रवण स्थळ होते. मनपाच्या अधिकाऱ्यांना ते कधीच दिसले नाही. त्याचबरोबर याच ठिकाणी अनेकांसोबत अशा घटना घडल्या. परंतु त्यांनी कधी तक्रार केली नाही. खुद्द मनपा आयुक्तांनी आजपर्यंत तक्रारच आली नसल्याचे सांगितले. याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर, मनपाने त्याची दखल घेतली. रस्ता आज समतोल केला. पण त्याचा फायदा काय? आमच्या घरचा तर जीव गेला. किमान यात दोषी कोण? याचा शोध प्रशासनाने घ्यावा.
- मधुरा पुराडभट, मृत साधना यांची मुलगी