मतभेदानंतर ठरले भाजपचे मंडळ अध्यक्ष
By admin | Published: January 10, 2016 03:30 AM2016-01-10T03:30:42+5:302016-01-10T03:30:42+5:30
भाजपच्या पक्षसंघटनेत अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या मंडळ अध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी बरीच रस्सीखेच झाली. स्थानिक पातळीवर बरेच मतभेदही झाले.
मेळाव्यात आज घोषणा : जुने सहाही अध्यक्ष बदलले
नागपूर : भाजपच्या पक्षसंघटनेत अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या मंडळ अध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी बरीच रस्सीखेच झाली. स्थानिक पातळीवर बरेच मतभेदही झाले. होत असलेल्या विलंबावर शहर अध्यक्षांनी नाराजी केली. शेवटी मतभेदांकडे दुर्लक्ष करीत मंडळ अध्यक्षांची नावे निश्चित करण्यात आली. आज, रविवारी दुपारी ३ वाजता शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित मेळाव्यात नवनियुक्त मंडळ अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
भाजप पक्षसंघटनेत संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया पार पडली. जुने सहाही मंडळ अध्यक्ष बदलायचे, असा निर्णय पक्षपातळीवर घेण्यात आला होता. त्यामुळे बरेच नवे चेहरे इच्छुक होते. यातूनच स्पर्धा वाढली. तीन मंडळांमध्ये आमदारांच्या मनात एक नाव होते तर स्थानिक कार्यकर्त्यांची पसंती दुसरीच होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहा दिवसांपूर्वी पूर्व नागपूर, मध्य नागपूर व दक्षिण-पश्चिम नागपूर या तीन मंडळांच्या अध्यक्षाचे नाव निश्चित करून शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांच्याकडे सोपविण्यात आले होते. पश्चिम नागपूर, दक्षिण नागपूर व उत्तर नागपूर या तीन मंडळांमध्ये ताळमेळ जुळत नव्हता. त्यामुळे या तीन मंडळांच्या अध्यक्षांची नावे फायनल होत नव्हती. पूर्व नागपूर मंडळाच्या अध्यक्षपदी आ. कृष्णा खोपडे यांचे विश्वासू समजले जाणारे नगरसेवक महेंद्र राऊत यांची वर्णी लागली आहे. यापूर्वी राऊत यांना खोपडे यांच्या आशीर्वादाने नामनिर्देशित नगरसेवक म्हणून महापालिकेत काम करण्याची संधी देण्यात आली होती. मध्य नागपूर मंडळ अध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक कृष्णा कावळे यांचे नाव फायनल करण्यात आले. कावळे हे तीनवेळा नगरसेवक राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या नावाला कुणाचाही विरोध झाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण- पश्चिम नागपूरचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला होता. येथे प्रकाश भोयर यांचे नाव एकमताने निश्चित करण्यात आले.(प्रतिनिधी)
उत्तरच्या अध्यक्षाबाबत पदाधिकाऱ्यांची नाराजी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर नागपूरच्या मंडळ अध्यक्षपदी दिलीप गौर यांची निवड करण्यात आली आहे. गौर हे सध्या उत्तर मंडळात महामंत्री आहेत. या पदासाठी नगरसेविका सुषमा चौधरी यांचे पती संजय चौधरी हे इच्छुक होते. ते ही सध्या उत्तर मंडळात महामंत्री आहेत. मात्र, गौर यांनी लावलेली फिल्डिंग वरचढ ठरली. आ. मिलिंद माने यांनी या प्रकरणी तटस्थ राहणे पसंत केले. गौर यांच्या निवडीमुळे नाराज झालेले विद्यमान मंडळ अध्यक्ष विक्की कुकरेजा व शहर महामंत्री प्रभाकर येवले यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी रविभवनात उपेंद्र कोठे व रामदास आंबटकर यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
पश्चिममध्ये मित्रा- गावंडे टसल
पश्चिम नागपूर मंडळ अध्यक्षपदासाठी किसन गावंडे व सुमित मित्रा या दोन विद्यमान मंडळ महामंत्र्यांमध्ये रस्सीखेच झाली. दोन्ही पदाधिकारी तुल्यबळ आहेत. मित्रा यांच्या पाठिशी पदाधिकाऱ्यांची एक चमू होती तर गावंडे यांना अखेरच्याक्षणी आ. सुधाकरराव देशमुख यांचे पाठबळ मिळाले. त्यामुळे गावंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
दक्षिणमध्येही आमदारांचीच चलती
दक्षिण नागपूर मंडळाचे अध्यक्षपद निश्चित करताना आ. सुधाकर कोहळे यांचीच चलती राहिली. कोहळे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे व सध्या मंडळात महामंत्री असलेले संजय ठाकरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जुने कार्यकर्ते व महामंत्री विजय आसोले यांनीही अखेरपर्यंत दावा सोडला नाही. बऱ्याच स्थानिक पदाधिकाऱ्यांची आसोले यांना पसंती होती. मात्र, कोहळेंच्या फेवरमुळे ठाकरेंना संधी मिळाली.