अंडा बिर्याणी आणि मुदतबाह्य दुधानंतर आता टॉयलेटच्या पाण्याची चहा
By नरेश डोंगरे | Published: May 12, 2024 11:27 PM2024-05-12T23:27:01+5:302024-05-12T23:27:18+5:30
व्हिडिओमुळे खळबळ, उलटसुलट चर्चा : रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र अस्वस्थता
नागपूर : आधी अंडा बिर्याणी आणि नंतर मुदतबाह्य झालेल्या दुधाचे प्रकरण रेल्वे प्रशासनात खळबळ उडवून गेले असताना आता चहासाठी टॉयलेटमधील पाण्याचा वापर केला जात असल्याचा आरोप होत असल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
दोन आठवड्यांपासून रेल्वे प्रशासनाला अंडा बिर्याणी प्रकरणाने अडचणीत आणले आहे. बल्लारशाह आणि नागपूर रेल्वे स्थानकावरून विकण्यात आलेल्या अंडा बिर्याणीने दोन आठवड्यांपूर्वी ७० प्रवाशांना विषबाधा झाली होती. हे प्रवासी नागपूरपासून ईटारसी, भोपाळ, झाशी, कानपूरपर्यंत ओकाऱ्या करत गेल्याने महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश रेल्वे प्रशासनातही अंडा बिर्याणीने चांगलीच खळबळ निर्माण केली आहे.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना या संबंधाने ठिकठिकाणांहून वेगवेगळे प्रश्न विचारले जात असताना संबंधित वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रकरणात दोषींवर अद्याप का कारवाई नाही झाली, असाही प्रश्न विचारला जात आहे. हे सुरू असतानाच वर्धा रेल्वे स्थानकावर मुदतबाह्य दूध आणि कॉफीचे पाकिटं विकताना वेंडर पकडल्या गेल्याची चर्चा आहे. ते कमी की काय म्हणून आता रेल्वेत विकल्या जाणाऱ्या चहामध्ये टॉयलेटमधील पाण्याचा वापर केला जात असल्याचा आरोप भारतीय यात्री संघाने केल्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे.
काही दिवसांपासून एक व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ट्रेनमध्ये चहा विकणारे काही जण, टॉयलेटमध्ये, नको त्या ठिकाणी चहाचे ट्रे ठेवून पाणी गरम करण्याच्या ईलेक्ट्रीक कॉईलच्या माध्यमातून चहा तयार करीत असल्याचे संतापजनक दृष्य या व्हिडीओतून दिसत आहे. या व्हिडीओने रेल्वे प्रशासनासोबतच रेल्वे प्रवाशांनाही अस्वस्थ केले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रवाशांनी आपल्या घरूनच खानपानाचे साहित्य घेऊन प्रवासाला निघावे, असे आवाहन यात्री केंद्राचे सचिव बसंत कुमार शुक्ला यांनी केले आहे.
रेल्वे प्रशासनाची कोंडी
या एकूणच प्रकाराने रेल्वे प्रशासनाची चांगलीच कोंडी केली आहे. दरम्यान, कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नसून प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कुणालाही सोडले जाणार नसल्याचे दावे रेल्वे अधिकारी करीत आहेत. गेल्या आठवड्यापासून रेल्वेत अवैध खान-पान विकणाऱ्यांविरुद्ध धरपकड मोहिम सुरू करण्यात आली असून, आठवडाभरात ३० अवैध विक्रेत्यांना रेल्वे अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.