आठ वर्षांनंतर निघाला कन्हान नदीवरील नवीन पुलाचा मुहूर्त! गडकरींच्या हस्ते आज लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2022 03:13 PM2022-09-01T15:13:28+5:302022-09-01T15:15:37+5:30
१५२ वर्षांपूर्वीचा पूल झाला जीर्ण
कामठी (नागपूर) : आठ वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या कन्हान नदीवरील नवीन पुलाच्या लोकार्पणाचा मुहूर्त अखेर प्रशासनाला मिळाला आहे. गुरुवारी (दि. १) सायंकाळी पाच वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण केले जाईल.
नागपूर-जबलपूर महामार्गावर (सन १८७०) १५२ वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने कन्हान नदीवर ४०० मीटर अंतराच्या पुलाचे बांधकाम केले होते. यासाठी १२ लाख ५० हजार रुपयांचा खर्च झाला होता. हा पूल सध्या जीर्ण झाला आहे. यासोबतच या नदीवर मुंबई-हावडा रेल्वे मार्गाचा पूल आहे. त्यामुळे कन्हान येथील रेल्वे फाटक सातत्याने बंद असते. यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूने शेकडो जड वाहनाच्या लांब रागा लागतात. त्यामुळे आयुष्य संपलेल्या ब्रिटिशकालीन पुलावर जड वाहनाचा सातत्याने भार येतो. त्यामुळे हा पूल कोसळण्याची शक्यता तज्ज्ञामार्फत अनेकदा व्यक्त केली गेली आहे. त्यामुळे कन्हान नदीवर नवीन पूल उभारण्याची मागणी होती.
२०१४ झाले होते भूमिपूजन
२०१४ मध्ये रामटेकचे तत्कालीन खासदार मुकुल वासनिक व तत्कालीन केंद्रीय दळणवळण मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांनी नवीन पुलाच्या बांधकामाकरिता ४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यानंतर २५ फेब्रुवारी २०१४ रोजी या कामाचे भूमिपूजन झाले. मधल्या काळात या पुलाचे काम रेंगाळले. यामुळे प्रोजेक्ट कॉस्टही वाढली होती. राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या पुलाच्या कामाला गती देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. शेवटी २०२२ मध्ये या पुलाचे काम पूर्ण झाले आहे.
नवीन पूल ४१० मीटरचा
नवीन पुलाची लांबी ४१० मीटर, तर रुंदी १५ मीटर इतकी आहे. या बांधकामावर आतापर्यंत ५० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या उड्डाणपूलामुळे कन्हान येथील रेल्वे फाटकावर वाहतूक कोंडी होणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधीही लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहतील.