अर्न्स्ट अँड यंगच्या इशाऱ्यानंतरही पीएनबी गाफील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 10:09 AM2018-02-22T10:09:46+5:302018-02-22T10:13:28+5:30
आंतरराष्ट्रीय कन्सल्टिंग फर्म अर्न्स्ट अँड यंगने मे २०१७ मध्ये गीतांजली जेम्स या कंपनीपासून व मेहुल चोकसीशी संबंधित नीरव मोदीसारख्या कंपन्यांपासून सावध राहण्याचा इशारा १५ बँकांच्या समूहाला दिला होता.
सोपान पांढरीपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय कन्सल्टिंग फर्म अर्न्स्ट अँड यंगने मे २०१७ मध्ये गीतांजली जेम्स या कंपनीपासून व मेहुल चोकसीशी संबंधित नीरव मोदीसारख्या कंपन्यांपासून सावध राहण्याचा इशारा १५ बँकांच्या समूहाला दिला होता. पण त्यानंतरही पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) गाफील राहिली व परिणामी बँकेने ११,४०० कोटी गमावले.
असा सनसनाटी खुलासा लोकमतशी बोलताना मुंबईतील प्रवर्तन निदेशालयातील (इडी) एका उच्चपदस्थ सूत्राने केला आहे. गीतांजली जेम्सकडे ३५ बँकांचे ७००० कोटी थकले आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षात मेहुल चोकसीच्या गीतांजली जेम्स जिली नक्षत्र व नीरव मोदीच्या सतत होणाऱ्या ‘प्रगती’शी या कंपन्यांचे बँक व्यवहार सुसंगत अथवा पारदर्शक नव्हते. त्यावरून काही बँकांनी या कंपन्यांकडे असलेल्या बलाढ्य रकमेच्या थकीत कर्जवसुलीबाबत चिंता व्यक्त केली होती. शेवटी नेमका काय प्रकार आहे त्याची चौकशी करण्यासाठी १५ बँकांच्या समूहाने अर्न्स्ट अँड यंग या फर्मची नेमणूक केली व मेहुल चोकसी, गीतांजली जेम्स, नीरव मोदी इत्यादी कंपन्यांची गोपनीय चौकशी करण्याचे काम सोपवले होते, अशी माहिती या सूत्राने दिली.
मजेची बाब म्हणजे या १५ बँकांच्या समूहात पीएनबीसुद्धा होती. अर्न्स्ट अँड यंगने सर्वंकष चौकशी करून प्रोजेक्ट ज्युबेल्स या नावाचा गोपनीय अहवाल मे २०१७ मध्ये या बँक समूहाला दिला होता.या अहवालात गीतांजली जेम्स व संबंधित कंपन्या हिरेजडित जवाहिराच्या किमती अव्वाच्या सव्वा दाखवून बँकांकडून मोठाली कर्जे उचलत आहेत.
पण या कंपन्यांजवळ कर्ज परत करण्यासाठी पुरेशी संपत्ती तारण स्वरूपात नाही. तेव्हा बँकांनी सावध राहावे असा स्पष्ट इशारा अर्न्स्ट अँड यंगने दिला होता, असेही या सूत्राने सांगितले.
चौकशीदरम्यान गीतांजली जेम्सचे निर्यात व्यापारावर अधिक लक्ष असल्याची माहिती मिळाली पण त्यासंबंधी कुठलेही दस्तावेज अर्न्स्ट अँड यंगला मिळाले नाही. अनेक विदेशी ग्राहक कंपन्यांनी गीतांजलीशी व्यापार करण्यासाठी एकाच मध्यस्थाची नेमणूक केली असल्याचे सूत्राने सांगितले.हा अहवाल मिळाल्यानंतर मेहुल चोकसीच्या पत्नीच्या संपत्ती बाबतची माहिती मागवली होती. पण कर्जवसुली संबंधात कुठलीही कारवाई झाली नाही अशी माहिती या सूत्राने दिली.
दरम्यान याबाबत पीएनबीची बाजू जाणून घेण्यासाठी लोकमतने बँकेचे मुंबईतील झोनल मॅनेजर विमलेश कुमार यांच्या कार्यालयाशी संपर्क केला असता या प्रकरणाबाबत बँकेच्या दिल्ली मुख्यालयाशी बोला असे उत्तर मिळाले. दिल्ली मुख्यालयातही कुणी ज्येष्ठ अधिकारी बोलायला तयार झाला नाही व ई-मेलवर पाठविलेल्या प्रश्नावलीला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.