फडणवीस यांच्यानंतर ड्रॅगन पॅलेसला निधीच मिळाला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2022 07:23 PM2022-11-05T19:23:37+5:302022-11-05T19:24:04+5:30
Nagpur News ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकास आराखड्याला २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली. परंतु, मागील अडीच वर्षांत विकास आराखड्याच्या अनुषंगाने कोणताही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही.
नागपूर : ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट थीम पार्क व कन्व्हेंशन सेंटर, तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकास आराखड्याला २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली. परंतु, मागील अडीच वर्षांत विकास आराखड्याच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या काळात कोणताही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे विकास आराखड्याची अंमलबजावणी थांबली होती, असा आरोप ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख ॲड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केला. सध्या फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे थांबलेल्या विकासकामाला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा २३ व्या वर्धापन दिनानिमित्त तीनदिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ८ ते १० नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहितीही ॲड. कुंभारे यांनी यावेळी दिली.
त्यांनी सांगितले, ८ नोव्हेंबरला राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात येईल. सकाळी १०.३० वाजता भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्धवंदना व धम्मदेसना होईल. जपान येथील भिक्खू संघही ऑनलाइन सहभागी होतील. दुपारी विद्यार्थी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. सायंकाळी ६.३० वाजता लोकशाहीर संदेश विठ्ठल उमप यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. ९ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० सलग १०० तास गाण्याचे रेकॉर्ड करणारे प्रवीण भिवगडे तसेच कामठी व नागपूरच्या स्थानिक कलावंतांचा ‘बुद्ध ही बुद्ध है’ हा बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम सादर केला जाईल, तर १० नोव्हेंबरला प्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माडे हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. फेस्टिव्हलनिमित्त परिसरात प्रदर्शनसुद्धा आयोजित करण्यात आले आहे. यात लघु, सूक्ष्म व मध्यम विभाग, खादी ग्रामोद्योग, हातमाग विभाग, वस्त्रोद्योग, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, आदींचे स्टॉल राहतील.