चार दिवसानंतर इन्टर्न डॉक्टर रुग्णसेवेत रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:07 AM2021-05-09T04:07:41+5:302021-05-09T04:07:41+5:30
नागपूर : कोरोनाबाधितांना सेवा देणाऱ्या इन्टर्न(आंतरवासिता)डॉक्टरांना ५० हजार रुपये मानधन देण्याच्या मुख्य मागणीला घेऊन मंगळवारपासून संपावर गेलेल्या इन्टर्न डॉक्टरांनी ...
नागपूर : कोरोनाबाधितांना सेवा देणाऱ्या इन्टर्न(आंतरवासिता)डॉक्टरांना ५० हजार रुपये मानधन देण्याच्या मुख्य मागणीला घेऊन मंगळवारपासून संपावर गेलेल्या इन्टर्न डॉक्टरांनी शनिवारी पालकमंत्री नितीन राऊत यांच्या आश्वासनानंतर संप मागे घेतला. सलग चार दिवसानंतर डॉक्टर रुग्णसेवेत रुजू झाले.
कोविड रुग्णांना सेवा देणाऱ्या मुंबई व पुण्याच्या इन्टर्न डॉक्टरांना मागील वर्षी ५० हजार रुपये मानधन मिळाले होते. ते इतरही इन्टर्न डॉक्टरांना देण्यात यावे, या मागणीसोबतच ३०० रुपये प्रति दिवस भत्ता व शासनाने विमा कवच प्रदान करावे, आदी मागण्यांसाठी डॉक्टरांनी मंगळवारपासून संपाचे हत्यार उपसले. मेयो, मेडिकलचे मिळून साधारण ३५० वर डॉक्टर संपात सहभागी झाले होते. संपाचा फटका रुग्णसेवेला बसत होता. संपाच्या काळात डॉक्टरांचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनाही भेटले, परंतु तोडगा निघाला नाही. शनिवारी पालकमंत्री राऊत यांना भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांनी कोविड भत्त्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले, सोबतच संप मागे घेण्यास सांगितले. मनपा आयुक्त यांनी विमा सुरक्षा देण्याची खात्री दिली. कोविड रुग्णांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन संप मागे घेण्याचा त्याच वेळी निर्णय घेण्यात आला. परंतु एक महिन्यात मागणी पूर्ण न झाल्यास योग्य ते पाऊल उचलू, असा इशाराही त्यांनी दिला.