गणेशोत्सवानंतर टेकडी उड्डाण पूल पाडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:07 PM2018-08-21T23:07:17+5:302018-08-21T23:08:43+5:30
नागपूर रेल्वे स्थानक परिसर सुशोभित करणे, वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे, यासाठी त्या परिसराच्या विकासाचीही जबाबदारी मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर सोपविण्यात आली. या परिसराच्या विकासाचे संकल्पचित्र नागपूर मेट्रोने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे मंगळवारी बैठकीत सादर केले. या नियोजनाची प्रशंसा करीत गणेशोत्सवानंतर २५ सप्टेंबरपासून रेल्वे स्थानकासमोरील मानस चौक ते जयस्तंभ चौक दरम्यानचा टेकडी उड्डाणपूल तोडण्याच्या कामाला सुरुवात करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानक परिसर सुशोभित करणे, वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे, यासाठी त्या परिसराच्या विकासाचीही जबाबदारी मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर सोपविण्यात आली. या परिसराच्या विकासाचे संकल्पचित्र नागपूर मेट्रोने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे मंगळवारी बैठकीत सादर केले. या नियोजनाची प्रशंसा करीत गणेशोत्सवानंतर २५ सप्टेंबरपासून रेल्वे स्थानकासमोरील मानस चौक ते जयस्तंभ चौक दरम्यानचा टेकडी उड्डाणपूल तोडण्याच्या कामाला सुरुवात करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मुंजे चौकालगत असलेल्या नेताजी मार्केटचाही विकास नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने करावा. त्यातून होणाऱ्या मिळकतीतील ५० टक्के नफा नागपूर महापालिकेला द्यावा, असेही निर्देश गडकरी यांनी दिले.
जरीपटका रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात करा
केंद्रीय रस्ते निधीतून नागपुरात इटारसी रेल्वे लाईनवरील जरीपटक्याला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाचे भूमिपूजन तातडीने करण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी दिले. या निधीतून नागपूर शहरात चार रेल्वे उड्डाण पुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे.
अंबाझरी, फुटाळा, तेलंगखेडीचे सौंदर्यीकरण
अंबाझरी उद्यान विकासाकरिता महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे न सोपविता महापालिकेनच अंबाझरी उद्यानाचा विकास करावा. फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरचा प्लान तयार आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी. तेलंगखेडी उद्यानातील कृषी कन्व्हेंशन सेंटरचे कार्य आणि विवेकानंद स्मारक येथे लाईट अॅण्ड साऊंड शो या सर्व कामांची सुरुवात तातडीने करा, असे निर्देश गडकरी यांनी बैठकीत दिले.
‘साई’च्या कामाला सुरुवात करा
स्पोर्ट अथॉरिटी आॅफ इंडिया (साई) अंतर्गत वाठोडा येथे प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुलाच्या मार्गातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा करा, प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी गौण निधीतून ३० कोटी उपलब्ध करा, यासोबतच ३० कोटी केंद्र शासनाकडून प्राप्त होतील. यातून तातडीने साईचे काम सुरू करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले. तसेच याच परिसरात सिम्बॉयसीस सह रेमंडच्या शाळेकरिता आठ एकर जागा करण्याचे निर्देश देण्यात आले.
शाळा पाडण्यासाठी नोटीस बजवा
वंजारी नगर जलकुंभ ते अजनी रेल्वे स्टेशन दरम्यानच्या प्रस्तावित मार्गासाठी सीआरएफ मधून ५०.३ कोटी मंजूर करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम करावयाचे आहे. यासाठी तातडीने निविदा काढा, रेल्वेच्या जागेचा प्रश्न निकाली काढा, मार्गात अडथळा असलेले केंद्रीय विद्यालय पाडण्याची नोटीस बजवा, रेल्वेची जागा लीजवर घेण्यासाठी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहा. डीपी आराखड्यात माझे घर येत असेल तर तेही पाडावे लागेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
रामझुल्याचा विस्तार कस्तूरचंद पार्कपर्यंत
रामझुल्याच्या दुसऱ्या बाजूचे काम गतीने सुरू आहे. दोन्ही बाजूने रहदारी सुरू झाल्यानतंर वाहनांची वर्दळ वाढणार आहे. याचा विचार करता रामझुल्याचा विस्तार कस्तूरचंद पार्कपर्यंत करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले. रामझुला ‘एलिवेटेड’स्वरुपाचा बनविण्यात यावा. त्याची उतरती बाजू कस्तूरचंद पार्कपर्यंत ठेवा. यामुळे जयस्तंभ चौकात वाहतुकीवर ताण येणार नाही. तसेच लोहापूल जवळ पुश बॉक्स पद्धतीचा मार्ग तयार के ल्यास लोहापूल येथील वाहतूक सुरळीत होईल, अशी सूचनाही त्यांनी केली.