गुजरात निकालानंतर राज्यातील आमदारांना संघाचे ‘बौद्धिक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 09:29 PM2017-12-14T21:29:35+5:302017-12-14T21:33:42+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस व विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता व्हावी व महाराष्ट्रातील निवडणुकांत विकासाची ठोस कामे घेऊन जाता आले पाहिजे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धारणा आहे. या मुद्यावरच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या मंत्री-आमदारांना संघातर्फे विशेष ‘बौद्धिक’ देण्यात येणार आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस व विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता व्हावी व महाराष्ट्रातील निवडणुकांत विकासाची ठोस कामे घेऊन जाता आले पाहिजे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धारणा आहे. या मुद्यावरच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या मंत्री-आमदारांना संघातर्फे विशेष ‘बौद्धिक’ देण्यात येणार आहे. गुजरात निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच १९ किंवा २० डिसेंबर रोजी हा ‘उद्बोधन वर्ग’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मागील तीन वर्षांपासून संघातर्फे आमदार व मंत्र्यांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी त्यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ विचारधारा आणि सामाजिक क्षेत्रात कार्याबाबत माहिती देण्यात आली होती. यंदादेखील हिवाळी अधिवेशनानिमित्त राज्यभरातील आमदार नागपुरात आले आहेत. हा मुहूर्त साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपाच्या सर्व मंत्री व आमदारांसाठी या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. शक्यतो १९ डिसेंबर रोजीच रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात हा उद्बोधन वर्ग होईल. या वर्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यावेळी आमदार व मंत्री रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर महर्षी व्यास सभागृहात सर्वांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. मागील वर्षी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मार्गदर्शन केले होते. मात्र यंदा नेमके कोण मार्गदर्शन करणार याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे.
ही तर नियमित भेट : बापट
यासंदर्भात राज्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी १९ डिसेंबर रोजी या वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. संघस्थानावर भाजप आमदारांची श्रद्धा आहे व तेथे एकत्रित जाण्याची संधी आमदारांना या माध्यमातून मिळते. ही नियमित भेट असल्याचे त्यांनी सांगितले.
जनतेच्या अपेक्षापूर्तीसंदर्भात सूचना देणार
मागील काही काळापासून भाजपाचे काही आमदार व मंत्र्यांबाबत जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. विरोधकांकडूनदेखील आक्रमक भूमिका घेण्यात आली असून विधिमंडळात याचे प्रत्यंतर येत आहे. २०१९ च्या निवडणुकांना फार कालावधी राहिलेला नाही. अशा स्थितीत जनप्रतिनिधींनी जनतेमध्ये जाऊन खऱ्या अर्थाने काम केले पाहिजे, असे संघाकडून वारंवार सांगण्यात आले आहे. यासंदर्भातच संघाकडून आमदारांशी संवाद साधण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सोबतच भाजपाच्या एखाद्या मंत्र्याने कुठलीही गैरवर्तणूक केली तर ‘स्वयंसेवक’ बिघडला, अशी टीका होते. जनतेच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत आमदार व मंत्र्यांचे नेमके आचरण कसे हवे आणि जनहितासाठी कुठल्या बाबींमध्ये पुढाकार घ्यायला हवा, यावर उद्बोधन वर्गाचा भर राहणार आहे.