‘जय’नंतर आता ‘जयचंद’ही बेपत्ता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:21 AM2018-04-24T11:21:48+5:302018-04-24T11:21:57+5:30

पवनी (जिल्हा भंडारा) वन परिक्षेत्रात वास्तव्याला असलेल्या जयचंदचे ‘लोकेशन’ दीड ते दोन महिन्यांपासून नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला आणि भंडाऱ्यातील पवनी व चंद्रपुरातील नागभीड आणि तळोधी वन परिक्षेत्रात मिळेनासे झाले आहे.

After 'Jay' now 'Jaichand' also missing? | ‘जय’नंतर आता ‘जयचंद’ही बेपत्ता?

‘जय’नंतर आता ‘जयचंद’ही बेपत्ता?

ठळक मुद्देकऱ्हांडल्यात दीड महिन्यापासून दर्शन नाहीपवनी, नागभीड, तळोधीतही पाऊलखुणा दिसेना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: ‘जयचंद’ हा ‘जय’चा बछडा गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता झाला आहे. पवनी (जिल्हा भंडारा) वन परिक्षेत्रात वास्तव्याला असलेल्या जयचंदचे ‘लोकेशन’ दीड ते दोन महिन्यांपासून नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला आणि भंडाऱ्यातील पवनी व चंद्रपुरातील नागभीड आणि तळोधी वन परिक्षेत्रात मिळेनासे झाले आहे. या जंगलात त्याच्या पाऊलखुणाही दिसत नसल्याने तो नेमका कुठे बेपत्ता झाला, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे, वन विभागाने त्याला शोधण्यासाठी प्रभावी हालचालीही अद्याप सुरू केल्या नाहीत.
जय हा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याची ‘ओळख’ ठरला होता. तो १८ एप्रिल २०१६ पासून बेपत्ता आहे. त्याचे शेवटचे वास्तव्य पवनी वन परिक्षेत्रात होते. त्याला शोधण्यासाठी वन विभागाने आटोकाट प्रयत्न केले. तेलंगणातील जंगलात त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, अद्यापही त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्याच्या अचानक बेपत्ता होण्याने वातावरण तापले होते.
जयचंद हा जयचा बछडा होय. त्याची शरीरयष्टी व रुबाबही जयप्रमाणेच आहे. उमरेड-कऱ्हांडल्यातील जयची उणीव भरून काढण्याचा प्रयत्नही जयचंदच्या निमित्ताने झाला, परंतु तोही अचानक बेपत्ता झाला. त्याचे शेवटचे लोकेशन फेब्रुवारी २०१८ मध्ये ब्रह्मपुरी (जिल्हा चंद्रपूर) वन परिक्षेत्रात आढळून आल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या त्याचे ‘लोकेशन’ मिळत नसल्याने वन अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.

अन् तो कालव्यात पडला
उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात व्याघ्रदर्शनासाठी गोवंशापासून अन्य विविध फंडे वापरण्यात आले. वन कर्मचाऱ्यांकडून त्याचे अफलातून फोटोसेशन करण्यात आले. वाघांच्या बछड्यांचे नामकरण व त्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. वन अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे जयचंद हा १० जानेवारी २०१८ रोजी गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात पडला होता. त्याच्या लोकेशनबाबत पवनी वनपरिक्षेत्राचे आरएफओ (वन्यजीव) बाबा राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिवाय, जयचंदविषयी बोलण्याचेही टाळले.

‘जयचंद’ची ओळख
‘जय’ व ‘वीरू’ या दोन बछड्यांना एकाच वाघिणीने नागझिरा (जिल्हा गोंदिया) अभयारण्यात जन्म दिला. जय २०१३ साली कऱ्हांडल्यात दाखल झाला आणि तिथेच तो प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्या पाच वेगवेगळ्या वाघिणीच्या सहवासातून २० बछड्यांचा जन्म झाला. यातील श्रीनिवास, बिट्टू आणि जयचंद हे तीन वाघ त्यांच्या रुबाबामुळे चर्चेत राहिले. श्रीनिवासचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला तर बिट्टू हा सध्या नागभीड, तळोधी वनपरिक्षेत्रात वास्तव्याला असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. यात सर्वाधिक देखणा असलेला जयचंद हा उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील पवनी वनपरिक्षेत्रात वास्तव्यास होता.

Web Title: After 'Jay' now 'Jaichand' also missing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ