नागपुरात कारवाईनंतरही स्कूल बस बेलगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 08:56 PM2017-11-13T20:56:16+5:302017-11-13T21:02:45+5:30
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम तयार करण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आतापर्यंत १५६ वर स्कूल बस व व्हॅनवर कारवाईही केली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम तयार करण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आतापर्यंत १५६ वर स्कूल बस व व्हॅनवर कारवाईही केली. तरीही नियमांना धुडकावून शेकडो स्कूल बस व व्हॅन रस्त्यावर धावत आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. आरटीओनेही याला आता गंभीरतेने घेत कारवाईची गती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
उपराजधानीतील बहुसंख्य शाळेतील सुमारे ४० टक्के विद्यार्थी स्कूल बस, ३० टक्के विद्यार्थी स्कूल व्हॅन तर १० टक्के विद्यार्थी हे आॅटोरिक्षांमधून प्रवास करतात. म्हणूनच विद्यार्थी वाहतुकीला संवेदनशील वाहतूक म्हणून ओळखले जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूक करणाºया स्कूल बस व व्हॅनसाठी विशिष्ट नियमावली तयारी करण्यात आली. या नियमानुसार शहरात स्कूल बस व व्हॅनचा वेग ताशी ४० कि.मी. तर ग्रामीण भागात ताशी ५० कि.मी. पेक्षा जास्त असता कामा नये असे नियम घालून दिले. यासाठी स्पीड गव्हर्नर (वेग गतिरोधक) बसविण्याची सक्ती केली. परंतु काही स्कूल बस व व्हॅन चालक या स्पीड गव्हर्नरमध्ये गडबड करून वेग वाढवून घेतात व जास्त पैशांच्या लोभापायी जास्तीत जास्त फेरया मारतात. आरटीओच्या तपासणीत दोषी आढळून येणारया अशा स्कूल बस व व्हॅनवर जप्तीची कारवाई केली. मोटार वाहन निरीक्षकांसमोर नवीन स्पीड गव्हर्नर लावून नंतरच वाहन सोडून देण्यात आले. परंतु पुन्हा-पुन्हा या यंत्रात गडबड करीत असल्याचा प्रकार समोर येत आहेत. परिणामी, आजही शेकडो स्कूल बस व व्हॅन बेलगाम धावत आहेत. या शिवाय नियमानुसार स्कूल बसमध्ये मदतनीस आवश्यक आहे. लहान मुले व विद्यार्थिनींच्या बसमध्ये महिला मदतनीस ठेवण्याचा नियम आहे, बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, विद्यार्थ्यांच्या नावाची यादी व पालकांचे संपर्क क्रमांक, वाहनात शाळेची दप्तर ठेवण्यासाठी व्यवस्था असणे, आपत्कालीन दरवाजा असणे, वाहनाच्या दरवाज्यास चाईल्ड लॉक असणे, प्रथमोपचाराची पेटी असणे, वाहनामध्ये धोक्याचा इशारा देणारे इंडिकेटर्स बसविणे, वाहनामध्ये अग्निशमन यंत्र आसन क्षमतेनुसार असणे, विद्यार्थ्यांना चढताना व उतरताना आधारासाठी दरवाजाजवळ लोखंडी दांडा असणे यासारखे अनेक नियम आहेत. परंतु यातील बहुसंख्य नियम काही स्कूल बस व व्हॅनचालक पाळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
ग्रामीणतर्फे ७७ तर शहरतर्फे ७९ वाहनांवर कारवाई
नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयातर्फे एप्रिल ते आॅक्टोबर दरम्यान ७७ स्कूल बस व व्हॅनवर कारवाई करण्यात आली. यांच्याकडून २ लाख ६८४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर शहर आरटीओ कार्यालयातर्फे याच कालावधीत ७९ स्कूल बस व व्हॅनवर कारवाई करण्यात आली. यांच्याकडून १ लाख ७२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कारवाईचा वेग वाढविणार
नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयाकडून स्कूल बस व व्हॅन तपासणी कारवाई वेळोवेळी केली जाते. या महिन्यापासून या कारवाईला आणखी गती देण्यात येईल. दोषी आढळून येणारया वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही वायु पथकांना देण्यात आले आहे.
-श्रीपाद वाडेकर
प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण