सात लाखांचे पॅकेज मिळाले अन् त्याने गळफास लावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 09:48 PM2020-10-12T21:48:57+5:302020-10-12T21:50:29+5:30
Suicide,Yong, Engineer, Nagpur News सहा दिवसांपूर्वीच नोकरीवर लागलेल्या एका तरुण अभियंत्याने गळफास लावून आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही करुणाजनक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सहा दिवसांपूर्वीच नोकरीवर लागलेल्या एका तरुण अभियंत्याने गळफास लावून आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही करुणाजनक घटना घडली. ती उघडकीस आल्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. प्रवीण रूपराव वंजारी (वय २३) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्यू नरसाळा परिसरातील रहिवासी होता. प्रवीण मेकॅनिकल इंजिनिअर होता. तो पुण्याला राहत होता. लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यात नागपुरात परत आला. त्याला दोन विवाहित बहिणी आहेत. आईवडील वृद्ध आहेत. एक बहीण कळमन्यातील भरतवाडा परिसरात राहते. कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे प्रवीण, त्याचे आईवडील बहिणीच्या घरीच राहत होते. प्रवीणला ६ ऑक्टोबरला एका कंपनीत जॉब मिळाला. वर्षाला ७ लाखांचे पॅकेजही ठरले. त्यानुसार त्याचे ऑनलाईन ट्रेनिंग सुरू झाले. तेथे पुरेशी प्रायव्हेसी मिळत नसल्याचे सांगून प्रवीण त्याच्या नरसाळा भागातील गिरीराज अपार्टमेंटमध्ये आला. दरम्यान, शनिवारी रात्री प्रवीण त्याच्या वडिलांशी फोनवर बोलला. रविवारी सकाळी पुन्हा वडिलांनी फोन केला. मात्र, प्रवीणकडून फोन उचलला गेला नाही. सायंकाळी पुन्हा फोन केला. मात्र, वारंवार रिंग देऊनही तो फोन उचलत नसल्यामुळे वडिलांनी प्रवीणचा मित्र तेजस सुदाम माटे (वय २३, रा. न्यू सुभेदार लेआऊट) याला फोन करून प्रवीण राहत असलेल्या सदनिकेत जाऊन पहायला सांगितले. त्यानुसार तेजस प्रवीणच्या सदनिकेकडे गेला. दार आतून लावून होते. बरेच आवाज देऊनही प्रवीणकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्याने बाजूच्या खिडकीतून बघितले असता आतमध्ये प्रवीण गळफास लावून दिसला. तेजसने ही माहिती प्रवीणच्या कुटुंबीयांना कळविली. ते पोहचल्यानंतर सर्व जण दार तोडून आत गेले. हुडकेश्वर पोलिसांना कळविण्यात आले. सहायक उपनिरीक्षक प्रेम शुक्ला यांनी तेजसची तक्रार नोंदवून अकस्मात मृत्यूची नोंद केली.
तुम्ही रडू नका, माफ करा
मृत्यूपूर्वी प्रवीणने त्याच्या डायरीत सहा पानांची सुसाईड नोट इंग्रजीत लिहून ठेवली. त्यात त्याने कुटुंबीयांना रडू नका, माफ करा, असे कुटुंबीयांना उद्देशून म्हटले असल्याचे समजते.