कॉकपिटच्या दुरुस्तीनंतर विमान पुण्याला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:07 AM2021-07-26T04:07:27+5:302021-07-26T04:07:27+5:30
नागपूर : शनिवारी सायंकाळी कॉकपिटमध्ये जळण्याचा वास आणि थोडासा धूर निघत असल्याचे वैमानिकांना दिसून आल्यानंतर नागपूरला आकस्मिक उतरविण्यात आलेले ...
नागपूर : शनिवारी सायंकाळी कॉकपिटमध्ये जळण्याचा वास आणि थोडासा धूर निघत असल्याचे वैमानिकांना दिसून आल्यानंतर नागपूरला आकस्मिक उतरविण्यात आलेले विमान सकाळी दुरुस्तीनंतर प्रवाशांना घेऊन पुणेला रवाना झाले.
शनिवारी सायंकाळी इंडिगो एअरलाइन्सचे १८० प्रवासी क्षमतेचे ६ई ४७१ विमान जयपूरहून हैदराबादला जात होते. उड्डाणादरम्यान वैमानिकाला कॉकपिटमध्ये काही जळण्याचा वास आणि थोडा धूर निघत असल्याचे दिसून आले. त्यानंतर नागपूर एटीसीला परवानगी मागितल्यानंतर विमानाचे आकस्मिक लॅण्डिंग सायंकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आले. या विमानात १३७ प्रवासी होते. यादरम्यान नागपूर विमानतळावर नाइट हॉल्टला असलेल्या विमानाने दीड तासांनंतर प्रवाशांना हैदराबादला रवाना करण्यात आले. त्यानंतर एअरलाइन्सची इंजिनीअरिंग टीम डायव्हर्ट करण्यात आलेल्या विमानाच्या दुरुस्ती कामात गुंतली. सकाळी विमानाची दुरुस्ती झाल्यानंतर हे विमान ६ई ६३३५ नागपूर-पुणे मार्गावर चालविण्यात आले. विमान निर्धारित वेळेत सकाळी ८ ऐवजी सकाळी ९.४४ वाजता रवाना झाले.