सहा वर्षे होऊनही बुटीबोरी कामगार रुग्णालय कागदावरच

By सुमेध वाघमार | Published: June 10, 2024 05:41 PM2024-06-10T17:41:45+5:302024-06-10T17:41:58+5:30

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीने ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या नावाने ५ जून रोजी एक पत्र काढले.

After six years, Butibori Labor Hospital remains on paper | सहा वर्षे होऊनही बुटीबोरी कामगार रुग्णालय कागदावरच

सहा वर्षे होऊनही बुटीबोरी कामगार रुग्णालय कागदावरच

नागपूर : राज्य कामगार विमा महामंडळाने राज्यात नवीन १८ रुग्णालये स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर १० रुग्णालयांसाठी जमीन संपादित करण्याचा हालचालिंना वेग आला आहे. मात्र सहा वर्षांपूर्वी नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात २०० बेडचे अत्याधुनिक कामगार विमा रुग्णालयाचे भूमिपूजन होऊनही अद्यापही हे रुग्णालय कागदावरच आहे. जुनेच प्रस्तावित रुग्णालये अस्तित्वात आले नसताना नवे रुग्णालय हे केवळ तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीने ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या नावाने ५ जून रोजी एक पत्र काढले. यात संबंधित जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’ विभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून प्रस्तावित १० रुग्णालयांसाठी जमीन संपादित करून घेण्याकरीता पाठपुरावा करण्याचा सूचना केल्या आहेत. मात्र, २०० बेडच्या रुग्णालयासाठी नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील पाच एकर जागा २०१८ मध्येच राज्य कामगार विमा महामंडळाकडे हस्तांतरीत झालीे. १५ जुलै २०१८ मध्ये बांधकामाचे भूमिपूजनही झाले. असे असताना ५० टक्केही बांधकाम झाले नाही. 

कोट्यावधीचा निधी जातो कुठे?

बुटीबोरी औदयोगिक क्षेत्रात जवळपास लाखो कामगार काम करतात. यातील सुमारे ४० हजारांवर हे विमाधारक (ईएसआयसी) योजनेत समाविष्ठ आहे. कामगार व कारखानदार मिळून दर महिन्याला जवळपास कोट्यावधी रुपये कामगार विम्याच्या माध्यमातून शासनाला मिळतो. परंतु कामगारांना सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी बुटीबोरी येथील या इएसआयसी दवाखान्याला मान्यता दिली. बांधकामासाठी १७५ कोटी रुपयेही दिले. परंतु संथ गतीच्या बांधकामामुळे रुग्णालय कधी रुग्णसेवेत सुरू होणार हा प्रश्नच आहे. 

रुग्णांना गाठावे लागते नागपूर 

बुटीबोरी औदयोगिक क्षेत्रात शेकडो कंपन्या आहेत. कंपनीत, रस्त्यावर कुठेनाकुठे अपघात होतात. कुटुंबात कोणी आजारी पडल्यास आणि तो गंभीर स्वरुपाचा असल्यास थेट नागपुरातील सोमवारी पेठेतील राज्य कामगार विमा रुग्णालयात दाखल करावे लागते. परंतु या रुग्णालयातील सोयी केवळ नावालाच असल्याने कामगार रुग्ण अडचणीत येतात. उपचारासाठी पैसे भरूनही अद्ययावत उपचार मिळत नसल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत. 

आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार

ईएसआयसीचे सब रिजनल ऑफिसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, डिसेंबर २०२५ किंवा २०२६ मध्ये बुटीबोरी येथील रुग्णालयाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या १५ टक्के काम झाले आहे.

Web Title: After six years, Butibori Labor Hospital remains on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर