श्रीराम, शंकराचार्य, रामदास स्वामींनंतर यात्रा करणारे राहुल गांधी हे चौथे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2022 07:02 PM2022-09-14T19:02:19+5:302022-09-14T19:03:05+5:30
Nagpur News भगवान श्रीराम, पहिले शंकराचार्य आणि रामदास स्वामी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा केली. त्यानंतर अशी यात्रा करणारे राहुल गांधी हे चौथे आहेत, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी नागपुरात व्यक्त केले.
नागपूर : भगवान श्रीराम, पहिले शंकराचार्य आणि रामदास स्वामी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा केली. त्यानंतर अशी यात्रा करणारे राहुल गांधी हे चौथे आहेत. त्यांचीही यात्राही लोककल्याणासाठीच आहे. राहुल गांधी ह देखील धर्माचेच काम करीत आहेत, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी नागपुरात व्यक्त केले.
पटोले म्हणाले, राहुल गांधी यांची यात्रा सुरू झाली तेव्हापासून भाजपमध्ये अस्वस्थता सुरू झाली आहे. षडयंत्र आखून काँग्रेस आमदारांच्या फुटीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. झारखंड आणि बिहारमध्ये आमदार विकत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकशाही विकत घेण्याचे काम भाजप करीत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री मोदी, शहांचे हस्तक झाले
- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचं हस्तक असायला हवं; पण ते मोदी-शहा म्हणतात तसे ऐकतात. - महाराष्ट्राला लुटून गुजरातकडे पाठवले जात आहे. गुजरातच्या नेत्यांचा आशीर्वाद राहावा यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी शरणागती पत्करली आहे. उद्या मुंबई गुजरातमध्ये गेली तर नवल वाटायला नको, अशी टीका करीत गेलेली कंपनी महाराष्ट्रात परत यायला पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली. या मुद्द्यावर मुख्यमंत्री हे पंतप्रधान यांच्याशी बोलले. आता पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना किती मान देतात हेही कळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.