नागपुरात पावसाची बॅटिंग सुरुच; सकाळच्या रिमझिमनंतर दुपारी पुन्हा धो..धो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 02:51 PM2022-07-27T14:51:56+5:302022-07-27T15:00:13+5:30
दोन-चार दिवस पाऊस उसंत घेईल, असा दिलासादायक अंदाज हवामान विभागाने वर्तविला हाेता. मात्र, अचानक परिस्थितीत बदल झाला.
नागपूर : मंगळवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसानंतर आज सकाळी पावसाची हलकी रिमझिम सुरू होती. दरम्यान, दुपारी पुन्हा काळेकुट्ट ढग दाटून आले अन् जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
दोन-चार दिवस पाऊस उसंत घेईल, असा दिलासादायक अंदाज हवामान विभागाने वर्तविला हाेता. मात्र, अचानक परिस्थितीत बदल झाला. उत्तर-पश्चिम अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला व बंगालच्या खाडीतही सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झाले असल्याने आणि मान्सून ट्रफ दक्षिणेकडून उत्तरेकडे वळत असल्याने ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे काही दिवस विदर्भात मुसळधार पाऊस होण्याचीही शक्यता विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, नागपूरला काल ७ च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दोन तास धो-धो बरसला. त्यामुळे अनेक भागांतील रस्ते व काही वस्त्या पुन्हा जलमय झाल्या. नरेंद्रनगर व मनीषनगर रेल्वे अंडरब्रिजखाली पाणी जमा झाले. मेडिकल चौक, पडोळेनगर, त्रिमूर्तीनगर, काचिपुरा आदी भागातही पाणी जमा झाले. तर, आज सकाळी थोडी उसंत घेऊन दुपारी पुन्हा पावसाने जोरदार धडक दिली असून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.