पतीच्या मृत्यूनंतर 'ती' बनली कुली! कंबरेला पदर खोचत १७ वर्ष कष्ट; 'नारी शक्ती'ची यशस्वी कहाणी
By नरेश डोंगरे | Published: October 15, 2023 06:31 PM2023-10-15T18:31:12+5:302023-10-15T18:31:37+5:30
तीन लहान मुले आणि पहाडासारखे खडतर आयुष्य समोर आ वासून उभे होते. मात्र ती डगमगली नाही.
नागपूर : तीन लहान मुले आणि पहाडासारखे खडतर आयुष्य समोर आ वासून उभे होते. मात्र ती डगमगली नाही. तिने कंबरेला पदर खोचला अन् दंडाला बिल्ला बांधून उभी झाली रेल्वे स्टेशनवर. शेकडो जणांच्या गर्दीत ती एकटीच होती. मात्र, तिने स्वत:ला हरवू दिले नाही. स्वाभिमान अन् कष्टाच्या भरवशावर मुलांचा सांभाळ केला अन् पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुली म्हणून काम करत रेल्वेस्थानकावर भक्कम पाय रोवले.
विशाखा धर्मपाल डबले असे तिचे नाव. विशाखाचे पती धर्मपाल रेल्वे स्थानकावर कुली म्हणून काम करायचे. गरीबी असली तरी संसार सुखाचा होता. मात्र, पती नेहमीसाठीच निघून गेला. पोरकी झालेल्या विशाखा आणि तिच्या मुलांना सासू-सासरे आणि नातेवाईकांनी काही दिवस साथ दिली. विशाखाचे शिक्षण जेमतेम नवव्या वर्गापर्यंतच झालेले. त्यामुळे नोकरी मिळण्याचीही आशा नव्हती. सासर, माहेर दोन्हीकडे गरिबीच. त्यात आजुबाजुच्यांकडून मिळणारे वेगवेगळे सल्ले विशाखाला आणखीनच सैरभैर करीत होते. मात्र, तिने धिरोदत्तपणे वेळेशी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला.
घरच्या खुंटीला टांगलेला पतीचा बिल्ला दंडाला बांधला, कंबरेला पदर खोचला अन् रेल्वे स्टेशनवर उभी झाली. विशाखाच्या पतीसोबत 'कुलीगिरी' करणाऱ्यांनी विशाखाला साथ दिली अन् तिला 'कुली नंबर ६०' म्हणून मान्यता मिळाली. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रवाशांचे अवजड सामान डोक्यावर घेऊन विशाखाने कष्टाची रोजीरोटी मिळवली. मुलांचे शिक्षण अन् पालनपोषण करीत त्यांना मोठे केले. आज कुली म्हणून तिच्या कामाला १७ वर्षे झाली. या कालावधीत तिने कष्टाची भक्ती अर्थात शक्तीची उपासना करत स्वत:ला सिद्ध केले. तसे पाहता कुली म्हटले की अमिताभ बच्चनची आठवण येते. विशाखाही नागपूर रेल्वे स्टेशनवर कुलीगिरी करताना लेडी अमिताभ बनली.