आईपाठोपाठ बाळही गेले.. नातेवाईकांच्या संतापाचा भडका, 'मेडिकल'मध्ये गोंधळ
By सुमेध वाघमार | Published: October 17, 2023 06:06 PM2023-10-17T18:06:10+5:302023-10-17T18:10:56+5:30
मेडिकल प्रशासनाने तातडीने अतिदक्षता विभागाच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात केले
नागपूर : मेडिकलमध्ये प्रसूती झालेल्या एका मातेचा रात्री मृत्यू झाल्यानंतर बालरोग अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या बाळाचा सकाळी मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी अतिदक्षता विभागात घुसून गोंधळ घातल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाची मेडिकल प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तिथे कायम स्वरुपी सुरक्षा व्यवस्था उभी केली.
शिवानी नेवारे, रा. लाखनी भंडारा त्या मृत मातेचे नाव. प्राप्त माहितीनुसार, प्रसूतीचे दिवस पूर्ण होण्यापूर्वीच १२ ऑक्टोबर रोजी शिवानीची मेडिकलमध्ये प्रसूती झाली. सुरुवातीपासून तिची प्रकृती गंभीर असल्याने प्रसूतीनंतर तिला अतिदक्षता विभागात दाखल केले. तिला झालेले बाळ कमी दिवसाचे व कमी वजनाचे असल्याने त्याला वॉर्ड क्र. ५० या बाल अतिदक्षता विभागात भरती केले. १५ ऑक्टोबर रोजी शिवानीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर १६ ऑक्टोबर रोजी सकाळी तिच्या बाळाचाही मृत्यू झाला. पाठोपाठ दोन मृत्यूने नातेवाईकांचा संतापाचा भडका उडाला.
सोमवारी दुपारी सात ते आठ नातेवाईक बालरोग अतिदक्षता विभागात घुसले व गोंधळ घालू लागले. येथे सुरक्षा रक्षकाची ड्युटी लावली जात नाही. त्यामुळे निवासी डॉक्टर व परिचारिकांना त्यांना रोखणे कठीण झाले होते. परंतु त्याचवेळी इतर रुग्णांचे नातेवाइक धावल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेला गंभीरतेने घेत मेडिकल प्रशासनाने तातडीने अतिदक्षता विभागाच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात केले. या घटनेबाबत चौकशी समितीही नेमल्याची माहिती आहे.