मृत्यूनंतर प्रशासनाला आली जाग; नवीन बाभुळखेड्यातील जीर्ण घर पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 10:19 PM2022-07-15T22:19:35+5:302022-07-15T22:20:09+5:30
Nagpur News अनेक वर्षांपासून जीर्ण असलेल्या घराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. गुरुवारी रात्री घात झाला आणि घराचे छतच कोसळून एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी प्रशासनाला जाग आली.
नागपूर : अनेक वर्षांपासून जीर्ण असलेल्या घराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. गुरुवारी रात्री घात झाला आणि घराचे छतच कोसळून एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी प्रशासनाला जाग आली. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी नवीन बाभुळखेड्यातील जीर्ण व मोडकळीस आलेले घर पाडले.
नवीन बाभुळखेडा तीन मुंडी झेंडा चौक येथील विद्या रंगारी यांनी केसलवार कुटुंबाला आपले घर भाड्याने दिले होते. जीर्ण झालेले हे घर पावसामुळे १४ जुलै रोजी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास अचानक कोसळले. यात भाडेकरू किशोर केसलवार (३९), त्यांच्या पत्नी सीसीली के सलवार (२७), मुलगा गौरव केसलवार (१६) मलब्याखाली दबले. परिसरातील लोकांनी धाव घेऊन तिघांनाही बाहेर काढले. मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी किशाेरला तपासून मृत घोषित केले.
विशेष म्हणजे, नवीन बाभुळखेड्यातील जीर्ण घराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. रंगारी यांच्या घराच्या भिंतीला लागूनच असलेले जीर्ण व मोडकळीस आलेले घर कित्येक वर्षांपासून उभे होते. गुरुवारी घटना घडल्यानंतर प्रशासन शुक्रवारी तत्परता दाखवित मोडकळीस आलेले घर जेसीबीच्या मदतीने पाडले. एकीकडे किशोरच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू असताना, मनपाचे कर्मचारी घर तोडण्यात व्यस्त होते. पडके घर आधीच तोडले असते तर ही घटना घडली नसती, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे होते. मृताचा कुटुंबाला सरकारकडून मोबदला देण्याचीही मागणीही नागरिकांनी केली.
-अतिक्रमणाकडेही द्यावे लक्ष
वंजारी नगर पाणीटाकीपासून ते नवीन बाभुळखेडा वसाहतीकडे येणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. ठाकरे हायस्कूल समोर जवळपास ५० फुटांचा रस्ता पुढे २० फुटांवर आला आहे. त्यातच रात्रीच्या वेळी अनेक जड वाहने रस्त्यावर उभी केली जातात. यामुळे अनुचित घटना घडल्यास अग्निशमन यंत्रणेसह रुग्णवाहिकेला पोहोचायला उशीर होतो. याकडेही धंतोली झोनच्या सहायक आयुक्तांनी लक्ष द्यावे, रस्त्यावरील अतिक्रमण काढावे, अशीही मागणी आहे.