दुहेरी हत्याकांडानंतर तो रात्रभर फिरत होता अन् ती सकाळपासून किराणा विकत होती
By नरेश डोंगरे | Published: July 14, 2023 07:25 PM2023-07-14T19:25:27+5:302023-07-14T19:26:07+5:30
लोकमत स्पेशल: हत्या करून पुरावे नष्ट केल्यानंतरही ते कॉन्फिडन्ट होते
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : दीड वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या आजीची निर्घृण हत्या केल्यानंतर तो मृतकांच्या नातेवाईकांसोबत रात्रभर फिरत होता. तर, घरात जागोजागी उडालेल्या रक्तांच्या चिरकांड्या धुवून काढल्यानंतर ती सकाळपासून किराणा दुकानात ग्राहकांना सामान विकत होती. हत्या करून पुरावे नष्ट केल्यानंतर अत्यंत थंड डोक्याने वावरणाऱ्या कांबळे दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी गणेश शिवभरण शाहू आणि त्याची पत्नी गुड्डी शाहू यांच्यासह गणेशचा लहान भाऊ अंकित अशा तिघांना आज शुक्रवारी न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर या हत्याकांडाशी जुळलेले अनेक संतापजनक पैलू आज पुन्हा चर्चेला आले.
उषा कांबळे त्यांच्या राशी नामक दीड वर्षीय नातीला घेऊन १७ फेब्रुवारी २०१८ ला सायंकाळी ६ च्या सुमारास घराबाहेर पडल्या. रात्र झाली तरी त्या परतल्या नाही. त्यांचा फोनही बंद होता. त्यामुळे मुलगा रवीकांत कांबळे आणि नातेवाईक आजी-नातीचा शोध घेऊ लागले. रात्री १० नंतर त्यांनी हुडकेश्वर ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचा ताफा तिकडे पोहचला. तोवर उषा कांबळे नातीसह बेपत्ता झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेजारी, नातेवाईक आणि पोलीस शोध घेत ईकडे तिकडे फिरत होते. या सर्वांच्या मध्ये आरोपी गणेश शाहू हासुद्धा होता. त्याने काही वेळेपूर्वीच उषा आणि राशी कांबळेची कटरने गळा कापून हत्या केली होती आणि या दोघींचे मृतदेह अन्य आरोपींच्या मदतीने पोत्यात भरून विहिरगावजवळच्या नाल्यात फेकून तो घरी परतला होता. त्याने त्याच्या कारवर पडलेले रक्ताचे डाग धुवून काढले होते. त्यानंतर शहाजोगासारखा पोलिसांच्या सोबत तो शोध घेण्याचे नाटक करत ईकडे तिकडे रात्रभर फिरत होता.
आरोपीने ज्या खोलीत उषा आणि चिमुकल्या राशीची हत्या केली होती. त्या खोलीत रक्ताचे थारोळे साचले होते. भिंतीच नव्हे तर , सिलिंगवरही रक्तांच्या चिरकांड्या उडाल्या होत्या. गणेशची पत्नी गुड्डी हिने रात्रभर जागून ते सर्व धुवून काढले होते. त्यानंतर सकाळपासून ती आपल्या घरातील किराणा दुकानात बसून ग्राहकांना सामान विकत होती.
त्याची चाैकशी, ती बिनधास्त
सकाळी १० च्या सुमारास बेपत्ता उषा कांबळे आणि राशीचे मृतदेह नाल्यात पडून दिसले. त्यांचे गळे कापून दिसल्याने शहर हादरले. प्रचंड प्रमाणात संतप्त नागरिक तिकडे धावले. दरम्यान, शाहूच्या धुुतलेल्या कारवर रक्ताचे अस्पष्ट डाग दिसल्याने पोलिसांनी त्याला हुडकेश्वर ठाण्यात नेऊन त्याची चाैकशी सुरू केली. तरीसुद्धा आरोपी गुड्डी शाहू ईकडे बिनधास्त दुकान सांभाळत होती.
अन् अखेर खुलासा झाला
गणेश शाहू पोलिसांना काहीच सांगत नव्हता. अशात त्याच्या दुकानासमोर तत्कालीन पोलीस उपायुक्त नीलेश भरणे आणि काही पत्रकार चर्चा करीत होते. त्यावेळी गुड्डीने तिच्या घराच्या जिन्याचे दार लावून घेतले. ही कृती लोकमतच्या पत्रकाराला संशयास्पद वाटली. त्यासंबंधाने चर्चा केल्यानंतर डीसीपी भरणे आणि सर्व पत्रकार चार पोलिसांसह जिना चढून वरच्या खोलीत गेले अन् त्या खोलीचे फर्शच नव्हे तर भिंतीही रक्ताने सारवल्यासारख्या (पुसून काढल्याने) दिसल्या. ते बघून खाली आलेल्या महिला पोलिसांनी गुड्डीला पोलीसी खाक्या दाखविला आणि नंतर या थरारक हत्याकांडाचा खुलासा झाला होता.