गोव्यातील यशानंतर नागपूरात जंगी स्वागत; फडणवीसांनी गडकरींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 03:55 PM2022-03-17T15:55:56+5:302022-03-17T15:56:50+5:30
भाजपच्या गोव्यातील विजयानंतर नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.
Nitin Gadkari, Devendra Fadnavis : काही दिवसांपूर्वीच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळता सर्वच राज्यांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं. गोव्याच्या निवडणुकांची जबाबदारी भाजपनं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली होती. या निवडणुकांमध्ये भाजपला बहुमतदेखील मिळालं. भाजपच्या विजयानंतर नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. विजयी रॅलीदरम्यान फडणवीसांनी गडकरींच्या निवासस्थानी भेट दिली. या ठिकाणी त्यांनी गडकरींशी संवाद साधत पाया पडून आशीर्वादही घेतले.
गोव्यातील अभूतपूर्व यशाबद्दल नागपुरात भाजपकडून नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताच्या जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी मोठी रॅलीही काढण्यात आली होती. ही रॅली गडकरींच्या निवासस्थानाजवळ पोहोचली तेव्हा नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी फडणवीस यांचं औक्षण केलं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरींच्या पाया पडत त्यांचे आशीर्वादही घेतले.
महाराष्ट्रातही भगवा फडकवण्याचा निर्धार
काँग्रेस आणि इतर पक्ष जनतेपासून तुटलेले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीची लढाई नोटाशी होती. नोटाला देखील त्यांच्यापेक्षा चांगली मते मिळाली, असा खोचक टोला फडणवीसांनी यावेळी लगावला. "हा विजय माझ्या एकट्याचा नाही, तर भाजपचा आहे. गोव्यात काम करण्याची संधी मला मिळाली, त्यासाठी मी भाजपचा आभारी आहे. आमचे विरोधक देव पाण्यात घालून बसले होते. पण, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा सर्वच त्यांच्या हातातून गेलं. त्यांचं स्वप्न स्वप्नच राहिलं. 'मुंगेरीलाल के हसीन सपने' फक्त राहिले," असा टोला फडणवीसांनी लगावला.