शस्त्रक्रियेनंतर गायीच्या पोटात निघाले तब्बल ३० किलो प्लास्टिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 09:54 PM2022-05-19T21:54:27+5:302022-05-19T21:55:03+5:30
Nagpur News कामठी तालुक्यातील खैरी येथील शेतकरी शंकर जंगलू शेंडे यांच्या गाईच्या पोटातून शस्त्रक्रियेनंतर ३० किलो प्लास्टिक पन्नी काढण्यात आल्या.
नागपूर: राज्यात प्लास्टिक बंदी आहे. मात्र, असे असतानाही प्लास्टिकचा वापर कुठेही कमी झाला नाही. आता हे प्लास्टिक मुक्या जनावरांच्या जीवावर उठले आहे. चारा समजून खाल्ले जाणारे प्लास्टिक जनावरांच्या पोटात जमा होत आहे. कामठी तालुक्यातील खैरी येथील शेतकरी शंकर जंगलू शेंडे यांच्या गाईच्या पोटातून शस्त्रक्रियेनंतर ३० किलो प्लास्टिक पन्नी काढण्यात आल्या.
शेंडे यांच्या दुधाळु गाईने अचानक चारा खाणे बंद केले होते. याबाबत त्यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ. विलास गवखरे यांना सांगितले. डॉक्टरांनी गाईवर एप्रिल महिन्यात औषधोपचार सुरू केला. उपचारानंतरही गाईच्या प्रकृतीत सुधार होत नसल्याने अखेर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. १५ मे रोजी खैरी येथे डॉ. विलास गवखरे व डॉ. स्वप्निल सोनोने यांनी तब्बल चार तास शस्त्रक्रिया करून गायीच्या पोटातून जवळपास तीस किलो प्लास्टिक पन्नी काढली.