पावणेतीन वर्षानंतर सापडला नागपुरातील कुख्यात इच्छू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 12:39 AM2020-09-17T00:39:39+5:302020-09-17T00:40:52+5:30
मकोकात वॉन्टेड असलेला मोमिनपुऱ्यातील इप्पा टोळीतील इर्शाद ऊर्फ इच्छू खान पावणेतीन वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला आहे. तहसील पोलिसांनी त्याला अटक केली आहे. इच्छूला अटक केल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मकोकात वॉन्टेड असलेला मोमिनपुऱ्यातील इप्पा टोळीतील इर्शाद ऊर्फ इच्छू खान पावणेतीन वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला आहे. तहसील पोलिसांनी त्याला अटक केली आहे. इच्छूला अटक केल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
इच्छू मकोकांतर्गत तुरुंगात असलेल्या इप्पा आणि नौशादचा भाऊ आहे. इप्पा टोळीची एकेकाळी मोमिनपुरा परिसरात दहशत होती. २५ डिसेंबरला इप्पा टोळीने प्रतिस्पर्धी इम्मू काल्याला ‘तू हमारी तरफ आंख उठाकर देखता है, हमारी बात सुनता नहीं’ असे सांगून तलवारीने हल्ला केला. या घटनेनंतर पोलीस इप्पा टोळीचा शोध घेत होते. गुन्हे शाखेला इप्पा साथीदारांसह मोतिबागमध्ये असल्याची माहिती मिळाली. तेथे पोहोचल्यानंतर इप्पा टोळीने सहायक पोलीस निरीक्षकावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर इप्पा टोळीवर मकोकाची कारवाई करण्यात आली होती. इप्पा-नौशाद आणि त्यांचे साथीदार तुरुंगात आहेत. त्यानंतर इच्छू पोलिसांना चकमा देत फिरत होता. मंगळवारी पहाटे पोलिसांना इच्छू डोबीनगर झोपडपट्टीत आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी योजना आखली. ते इच्छूच्या घरासमोरील झोपडीत शिरले. तेथे इच्छू पोलिसांच्या हाती लागला. इच्छूला अटक केल्यामुळे तहसील पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. इच्छूची चौकशी केल्यास शहरातील अनेक गुन्हेगारांची माहिती मिळू शकते. त्याला न्यायालयासमोर हजर करून १२ दिवसांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयेश भांडारकर, दिलीप सागर, उपनिरीक्षक स्वप्निल वाघ, प्रशांत राठोड, सहायक उपनिरीक्षक संजय दुबे, हवालदार प्रमोद शनिवारे, सुनील ठाकूर, संजय मिश्रा, शंभू सिंह, शिपाई मनीष रामटेके, सुरज ठाकूर, कृष्णा चव्हाण, पुरुषोत्तम जगनाडे, रंजित बावणे, किशोर गरवारे, नजीर शेख, गगन यादव, नितीन राठोड, विकास यादव, ज्योती शर्मा यांनी पार पाडली.