उपराजधानीत कोरोनाच्या तीन प्रयोगशाळेनंतरही चाचणीचा वेग संथच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 09:35 AM2020-04-16T09:35:49+5:302020-04-16T09:37:20+5:30
नागपूरच्या तीन प्रयोगशाळेवरील नमुने तपासणीचा भार काहीसा कमी झाला आहे. नमुने तपसणीची संख्या वाढून प्रलंबित नमुन्यांची संख्या कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना तुर्तासतरी तसे होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अकोला मेडिकलमध्ये चाचणीला सुरूवात झाली आहे. परिणामी, नागपूरच्या तीन प्रयोगशाळेवरील नमुने तपासणीचा भार काहीसा कमी झाला आहे. नमुने तपसणीची संख्या वाढून प्रलंबित नमुन्यांची संख्या कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना तुर्तासतरी तसे होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. रोज तीनशेवर तपासण्या होण्याची गरज असताना दोनशेही तपासण्यात होत नसल्याचे वास्तव आहे. नागपुरात वाढत असलेली रुग्ण संख्या त्या तुलनेत नमुन्यांची तपासणी फारच संथ आहे. शासनाने यात दखल देऊन सुरू असलेल्या प्रयोगशाळेत यंत्र वाढविण्याची किंवा नवीन प्रयोगशाळा सुरू करण्याची आवश्यक्ता आहे. नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ५६वर गेली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत गुणात्मक वाढ होते. त्या तुलनेत मेयो, मेडिकल व एम्समध्ये सुरू असलेली नमुने तपासणीची संख्या समाधानकारक नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. चार ते पाच तासाच्या एका ‘सायकल’मध्ये मेयो, मेडिकल व ‘एम्स’मध्ये प्रत्येकी ३०-४० नमुने तपासणे आवश्यक असताना तसे होताना दिसून येत नाही. शासनाने यात लक्ष घालणे आवश्यक आहे. -मेयोतून जास्तीत जास्त चाचणी अपेक्षीतमेयोमध्ये जुनी आणि नवीन असे दोन यंत्र असताना दिवसभरात १०० नमुने तपासले जात नाही. या प्रयोगशाळेकडे नागपूरसह गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा या जिल्ह्याचा भार आहे. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा व भंडाऱ्यात सध्यातरी एकाही रुग्णाची नोंद नाही. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत एकच रुग्ण आढळून आला आहे. यामुळे नागपुरातील जास्तीत जास्त नमुने तपासणीकडे मेयोने लक्ष देण्याची गरज आहे.-‘एम्स’ची आणखी एक यंत्र खरेदीची तयारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) एकच यंत्र आहे. या प्रयोगशाळेकडे अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील नमुने तपासणीची जबाबदारी आहे. तीन दिवसांपूर्वी अकोला मेडिकलमध्ये चाचणीला सुरुवात झाली. येथे वाशिम व बुलढाण्यातील नमुने तपासली जात आहे. यामुळे ‘एम्स’कडे आता केवळ अमरावती व यवतमाळ हे दोनच जिल्हे राहिले आहे. येथे तीन टप्प्यात १००वर नमुने तपासले जात असल्याने काहीसे समाधानकारक चित्र आहे. ‘एम्स’ने आणखी एक यंत्र खरेदीची तयारी दर्शवली आहे. यात शासनाने मदत करण्याची आवश्यक्ता आहे. - मेडिकलमध्ये दोन यंत्राची गरजमेडिकलमध्ये एकच यंत्र आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आहे. परंतु त्यानंतरही आवश्यक त्या प्रमाणात नमुने तपासले जात नसल्याचे दिसून येत आहे. शासनाने आणखी एक यंत्र दिल्यास तपासणीची संख्या वाढण्यास मदत होऊ शकते. -नीरी व न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतही चाचणी शक्य ‘महाराष्ट्र अॅनिमल अॅण्ड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी’मध्ये कोरोना तपासणीला सुरूवात होणार होती. परंतु गेल्या चार दिवसांपासून ट्रायलच सुरू आहे. येथील प्रयोगशाळेचे किरटकर यांच्याशी संपर्क साधला असता, उद्या गुरुवारपासून चाचणी सुरू होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. येथे जर आणखी वेळ लागत असेल तर येथील यंत्र एम्स किंवा मेडिकलला उपलब्ध करून नमुने तपासणीची गती वाढविणे शक्य आहे. नीरी व प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत येथेही कोरोना तपासणी होऊ शकते. शासनाकडून पुढाकार घ्यायला हवा, असेही तज्ज्ञाचे म्हणणे आहे.