टोमॅटोनंतर आता कांदा रडवणार! कळमन्यात ठोकमध्ये ३० ते ४० रुपये भाव
By मोरेश्वर मानापुरे | Published: October 19, 2023 06:54 PM2023-10-19T18:54:31+5:302023-10-19T18:54:42+5:30
महाराष्ट्रात नवीन पीक डिसेंबरमध्ये येणार
मोरेश्वर मानापुरे, नागपूर: टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरातही विक्रमी वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे संकेत आहे. सध्या कांद्याचा भाव किरकोळ बाजारात दर्जानुसार ५० ते ६० रुपयांपर्यंत आहे. वाढीव दरामुळे टोमॅटोप्रमाणेच लोक कांद्याची चव विसरायला लागतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाढीव दरवामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येणार आहे. मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा, हे मुख्य कारण समजले जात आहे.
दक्षिण भारतातून आवक
यंदा महाराष्ट्रात कांद्याचे पीक उशीरा अर्थात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. सध्या कळमना बाजारात दक्षिण भारतातून म्हणजे बेंगळुरू (कर्नाटक) आणि आंध्रप्रदेशातून कांद्याची आवक सुरू आहे. आधीची २५ ट्रकची आवक आता १२ ट्रकपर्यंत कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने काहीच दिवसात भाव वाढले आहेत. ठोक बाजारात लाल कांदे दर्जानुसार ३० ते ४० रुपये भाव आहे. हे भाव १५ दिवस स्थिर राहील. सध्या कांदे संपूर्ण भारतात दक्षिण भारतातून विक्रीसाठी जात आहेत. पांढरे कांदे केवळ बेळगांव येथे निघाले आहेत. जागेवरच ५० रुपये किलो भाव आहे. त्यामुळे कळमन्यात विक्रीसाठी कुणीही बोलवित नाहीत.
डिसेंबरच्या प्रारंभी येणार माल
जळगाव, जामोद, धुळे, औरंगाबाद, चाळीसगाव, नाशिक, मराठवाडा येथील कांदे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होतील. त्यावेळी कांद्याचा दर्जा कसा राहील, हे आता सांगणे कठीण असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. नवीन कांदे बाजारात आल्यानंतरच भाव कमी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत ग्राहकांना जास्त दरातच कांदे खरेदी करावे लागतील. जानेवारी महिन्यात गुजरात येथील कांदे बाजारात येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर भाव स्थिर होतील. ऑक्टोबरअखेर आणि डिसेंबर या सणासुदीच्या महिन्यात वाढीव दर कमी होतील. यंदा शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कांदा पेरणीकडे पाठ फिरविली. त्यामुळे पिकावर परिणाम झाली आहे. त्यानंतरही कांद्याची टंचाई जाणवणार नसल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
जुन्या कांद्याचा साठा संपत आला आहे. तर महाराष्ट्रातील नवीन कांदे बाजारात येण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाववाढ झाली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातून आणि जानेवारीत गुजरातेतील कांदा कळमन्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल. आवक वाढल्यानंतर भाव कमी होण्याची अपेक्षा आहे.
-गौरव हरडे, अध्यक्ष, कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशन.