अडीच वर्षांनंतर 'ती' बेडवरून उठून चालायला लागली! ‘एम्स’च्या प्रयत्नांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 09:00 PM2022-04-18T21:00:22+5:302022-04-18T21:01:02+5:30
Nagpur News गुडघ्यातील वेदनेमुळे एका महिलेला तब्बल अडीच वर्षे बिछान्यावरच खिळून रहावे लागले होते. तिच्यावर नागपुरातील एम्समध्ये यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने ती पुन्हा चालू शकली.
नागपूर : चाळीस वर्षीय महिलेच्या उजव्या गुडघ्याच्या सांध्यामध्ये सूज व अतिशय वेदना होत्या. त्यामुळे गेली अडीच वर्षे ती अंथरुणाला खिळून होती. तिला चालणेच नाही तर, उभेही राहता येत नव्हते. जमिनीवरून सरपटत दैनंदिन कामे करावी लागायची. अखेर तिने नागपूरच्या ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’मधील (एम्स) आॅर्थाेपेडिक विभाग गाठले. तपासणीत तिचा गुडघ्यात ८० अंश विकृती असल्याचे आढळून आले. विभागाच्या ‘आॅथोर्पेडिक’ शल्यचिकित्सकांनी तिच्यावर गुडघा प्रत्यारोपणाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आणि दुसऱ्याच दिवशी ती बेडवरून उठून ‘वॉकर’च्या मदतीने चालायला लागली.
यवतमाळ जिल्ह्यातील ही महिला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘एम्स’च्या आॅर्थाेपेडिक विभागात दाखल झाली. या विभागाचे प्रभारी डॉ. समीर द्विडमुठे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या महिलेला संधिवाताचा एक प्रकार ‘आमवात’ होता. याला वैद्यकीय भाषेत ‘मेटाइड आर्थरायटिस’ म्हणतात. हा एक अपंगत्वाचा आजार आहे. जो गुडघ्याचे सांधे, हाताचे छोटे सांधे, मनगटाचे सांधे तसेच पाठीचा कणा यासह शरीराच्या अनेक सांध्यांवर प्रभाव टाकतो. मान, हाडांवरदेखील त्याचा परिणाम होतो. या आजाराचे वेळीच निदान व औषधोपचार सुरू झाल्यास रोगाची तीव्रता थांबविता येऊ शकते. परंतु जेव्हा रोगामुळे सांधे नष्ट होतात तेव्हा शस्त्रक्रियेची गरज पडते. या महिला रुग्णाची तपासणी केली असता क्ष-किरणात ‘आमवात’मुळे उजव्या गुडघ्याला पूर्ण इजा झाली होती. यामुळे गुडघा प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला.
-गुडघा प्रत्यारोपण आव्हानात्मक होते
‘एम्स’चे गुडघा प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. विवेक तिवारी म्हणाले, रुग्ण महिलेच्या गुडघ्याचे सांधे खराब झाले होते. गुडघ्याची विकृती सुधारण्यासाठी व वेदना थांबविण्यासाठी गुडघा प्रत्यारोपण हाच पर्याय होता. गुडघ्याची विकृती गंभीर असल्याने व पायाची हाडे फारच कमकुवत झाली असल्याने प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. शस्त्रक्रियेनंतर तिचा गुडघा पूर्णपणे सरळ झाला आणि विकृती पूर्णपणे सुधारली.
-जनआरोग्य योजनेतून ‘हिप’ व ‘नी रिप्लेसमेंट’
‘एम्स’मध्ये अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होऊ घातल्या आहेत. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून लवकरच ‘हिप रिप्लेसमेंट’ व ‘नी रिप्लेसमेंट’ सुरू केले जाणार आहे. याचा फायदा गरीब व योजनेच्या लाभार्थी रुग्णांना होईल.
-डॉ. मनीष श्रीगिरीवार, वैद्यकीय अधीक्षक ‘एम्स’ नागपूर