दोन आठवड्यानंतर व्यक्तिश: चौकशी
By admin | Published: September 11, 2016 02:14 AM2016-09-11T02:14:13+5:302016-09-11T02:14:13+5:30
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीने आवश्यक ती कागदपत्रे मागवून घेतली
झोटिंग चौकशी प्रकरण : अधिकारी येणार, खडसेंबद्दल अनिश्चितता
नागपूर : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीने आवश्यक ती कागदपत्रे मागवून घेतली असून पुढील दोन आठवड्यांत प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. प्रकरणातील संबंधित अधिकारी चौकशी समितीला सामोरे जातील. परंतु खडसे यांना चौकशी समितीसमोर बोलावण्यात येईल किंवा नाही, याबाबत मात्र अनिश्चितता आहे.
पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील भूखंड खरेदीवरून खडसे यांच्यावर आरोप होते. त्यामुळे त्यांना जूनमध्ये मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी न्या. झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती.
नागपूर येथील रविभवनातून या समितीचे चौकशीचे काम सुरू आहे. तीन महिन्यात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात चौकशी समितीचे कार्यालय सुरू होऊन दोन महिने लोटले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार चौकशी समितीने आतापर्यंत जमीन खरेदी व्यवहारातील कागदपत्रे मागविली आहेत. काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पत्रेही पाठविण्यात आली आहेत. अजूनपर्यंत व्यक्तिश: चौकशीला सुरुवात झालेली नाही. दोन आठवड्यांत या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. चौकशी समितीचे काम नागपुरातून सुरू असल्याने याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
चौकशी समिती नुकतीच पुणे आणि मुंबईत जाऊन आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कागदपत्रे सुद्धा तपासण्यात आली आहेत. दोन आठवड्यानंतर व्यक्तिश: सुनावणीला सुरुवात होणार आहे. सूत्रांनुसार खडसे यांना गरज पडली तेव्हाच पाचारण केले जाईल.
संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना मात्र चौकशी समितीला सामारे जावे लागणार आहे.(प्रतिनिधी)