दोन वर्षांनंतर रेल्वे प्रवाशांना मिळणार शिजलेले अन्न; बेस किचन होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 07:20 AM2022-02-13T07:20:00+5:302022-02-13T07:20:02+5:30
Nagpur News कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे नागपुरातील बेस किचन सुरू होत असून आगामी १५ दिवसांत रेल्वे प्रवाशांना बेस किचनमध्ये शिजविलेल्या दर्जेदार अन्नाची चव घेता येणार आहे.
दयानंद पाईकराव
नागपूर : कोरोनामुळे प्रवासी रेल्वेगाड्यात मिळणारे अन्न खाण्यास धजावत नव्हते. त्यामुळे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम काॅर्पोरेशनतर्फे चालविण्यात येणारे बेस किचन बंद होते; परंतु आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे नागपुरातील बेस किचन सुरू होत असून आगामी १५ दिवसांत रेल्वे प्रवाशांना बेस किचनमध्ये शिजविलेल्या दर्जेदार अन्नाची चव घेता येणार आहे.
कोरोनामुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्या होत्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या; परंतु या विशेष रेल्वेगाड्यातून प्रवास करणारे प्रवासी सुरक्षेच्या कारणास्तव बेस किचनमध्ये तयार झालेले अन्न घेण्याचे टाळून प्रवासाला निघताना घरूनच आपला टिफीन सोबत घ्यायचे. या कारणास्तव गेल्या दोन वर्षांपासून नागपूर रेल्वेस्थानकावरील बेस किचन बंद होते; परंतु आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ‘आयआरसीटीसी’ने नागपूर रेल्वेस्थानकावरील बेस किचन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार निविदा काढून विविध रेल्वेगाड्यात कंत्राट असलेल्या कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आले आहे. बेस किचनमध्ये अन्न तयार करणाऱ्या कंत्राटदाराला रेल्वेतील कंत्राटदार किती अन्न पाहिजे, याची मागणी करतील. त्यानुसार बेस किचनमध्ये अन्न तयार होऊन ते संबंधित गाड्यातील प्रवाशांना पुरविण्यात येणार आहे. आगामी १५ दिवसांत बेस किचनमध्ये अन्न तयार करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. बेस किचन बंद असल्यामुळे प्रवाशांना रेल्वेस्थानकावरील स्टॉल्सवर खाद्यपदार्थ विकत घेऊन आपली भूक भागवावी लागत होती; परंतु आता बेस किचन सुरू झाल्यामुळे त्यांना आपल्या आवडीनुसार ताजे खाद्यपदार्थ आणि भोजन मिळणार आहे.
या गाड्यात पुरविणार खाद्यपदार्थ
नागपूर रेल्वेस्थानकावर असलेल्या बेस किचनमधून तयार झालेले अन्न सुरुवातीला १२ रेल्वेगाड्यात पुरविण्यात येणार आहे. यात बंगळुरू राजधानी एक्स्प्रेस, सिकंदराबाद दुरांतो, हावडा दुरांतो, चेन्नई दुरांतो, आझाद हिंद एक्स्प्रेस, समरसता एक्स्प्रेस, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस आणि संघमित्रा एक्स्प्रेसचा समावेश आहे.
प्रवाशांना दर्जेदार भोजन देणार
‘बेस किचनमध्ये भोजन तयार करताना स्वच्छता आणि भोजनाच्या दर्जा राखण्यात येतो. त्यामुळे आयआरसीटीसीतर्फे प्रवाशांना दर्जेदार भोजन देण्याचा प्रयत्न राहणार आहे.’
-मनोज कुमार, प्रादेशिक अधिकारी, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम काॅर्पोरेशन, नागपूर
.............