वर्षभरानंतर खाद्यतेल झाले स्वस्त; आता खुशाल खा चमचमीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:06 AM2021-06-18T04:06:40+5:302021-06-18T04:06:40+5:30
- नेपाळ येथून ड्युटी फ्री आयात वाढली : आठ महिन्यांच्या तुलनेत भाव जास्तच नागपूर : पेट्रोल आणि डिझेलप्रमाणे खाद्यतेलाच्या ...
- नेपाळ येथून ड्युटी फ्री आयात वाढली : आठ महिन्यांच्या तुलनेत भाव जास्तच
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलप्रमाणे खाद्यतेलाच्या दराने काही दिवसांपूर्वी उच्चांक गाठला होता. पण गेल्या काही दिवसांपासून मागणीच्या तुलनेत जास्त पुरवठा, विदेशात कच्चे सोयाबीन व पाम तेलाचे उतरलेले दर आणि एक महिन्यापासून नेपाळमधून सीमा शुल्क फ्री कच्चे सोयाबीन व पाम तेल भारतात येत असल्याचा परिणाम खाद्यतेलाच्या दर घसरणीवर झाला. सोयाबीन तेलाच्या प्रति किलो किमतीत १३ ते १५ रुपये, पाम तेल १५ रुपये, सूर्यफूल १५ रुपये आणि शेंगदाणा तेलात १० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
सध्या दर कमी झाले असले तरीही नोव्हेंबर २०२० च्या तुलनेत दर वाढलेले आहेत. नोव्हेंबरमध्ये सोयाबीन प्रति किलो ९५ रुपये, शेंगदाणा आणि सूर्यफूल तेलाचे दर प्रत्येकी १२० रुपये किलो होते. त्यामुळे तेलाचे दर कमी झाले असे म्हणणे चुकीचे आहे. पण दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरीही दर आणखी कमी व्हावेत, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे.
इतवारीतील राणी सती एन्टरप्राईजेसचे संचालक अनिल अग्रवाल म्हणाले, महिन्यापूर्वी खाद्यतेलाच्या दराने उच्चांक गाठला होता. हा उच्चांक तोडण्याचे काम नेपाळने केले आहे. तसे पाहता भारतात सोयाबीनवर ३२.५ टक्के, पामवर २७ टक्के आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवर ३२ टक्के सीमाशुल्क आकारले जाते. याशिवाय सेससुद्धा आकारला जातो. प्रत्येक लीटरमागे उपरोक्त टक्के शुल्क चुकवावे लागते. त्यामुळे खाद्यतेलाचे भाव वाढतात. पण नेपाळमधून झिरो ड्युटी फ्री सोयाबीन व पाम तेल मोठ्या प्रमाणात भारतात निर्यात होत असल्याने तेलाचे भाव कमी झाले आहेत. आकडेवारीनुसार नेपाळने एप्रिलमध्ये २ लाख १५ हजार टन कच्चे सोयाबीन तेल आणि ३ हजार टन कच्च्या पामची निर्यात केली आहे. परिणामी तेलाच्या उपलब्धतेमुळे भाव कमी झाले. यंदा मान्सून चांगला येण्याच्या शक्यतेने भाव आणखी कमी होतील. गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले रेस्टॉरंट आणि हॉटेल्स सुरू झाली आहेत. मागणी वाढल्यानंतरही तेलाचे भाव कमी झाले आहेत. नेपाळमधून निर्यात वाढल्यास भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
खाद्यतेलाचे दर (प्रती किलो)
आधीचे आताचे
सूर्यफूल १९० १७५
सोयाबीन १६५ १५२
शेंगदाणा १८० १७०
पाम १६० १४५
मोहरी १८० १७०
राईस ब्रान १६५ १५०
जवस १८० १६८
शेतकऱ्याच्या घरातही विकतचे तेल :-
पूर्वी शेतात तेलबियांचे पीक घेतले जायचे. त्यापासून काढलेले घाण्याचे तेलच घरात वापरले जायचे. शिवाय विक्रीही करायचो. पण पिकाची टक्केवारी कमी झाल्याने पीक बाजारात विकतो आणि बाजारातून आवश्यक तेवढेच खाद्यतेल विकत घेतो.
वासुदेव आंबटकर, शेतकरी.
शेतात सोयाबीनचे पीक घेण्यात येते. पूर्वी सोयाबीनपासून घरच्या घाणीवर तेल काढत होतो. पण आता परवडत नाही. त्यामुळे पीक बाजारात विकतो. स्वयंपाकघरात लागणारे तेल बाजारातून विकत घेतो. सध्या तेलबियांचे पीक कमी झाले आहे.
कैलास ठाकरे, शेतकरी.