एजी, बीव्हीजीकडून कराराला केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:16 AM2021-02-06T04:16:13+5:302021-02-06T04:16:13+5:30
- काम समाधानकारक नसल्याचा आरोप : महापौर तिवारी यांनी मागविला अहवाल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातील कचरा संकलन ...
- काम समाधानकारक नसल्याचा आरोप : महापौर तिवारी यांनी मागविला अहवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील कचरा संकलन व्यवस्थापनाचे काम उत्तम होण्याच्या हेतूने १४ महिन्यांपूर्वी दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यातील अर्ध्या शहराची जबाबदारी सांभाळत असलेल्या एजी एन्वायरो व बीव्हीज कंपनीचे काम समाधानकारक नसल्याचे स्पष्ट होत आहे. करारानुसार दोन्ही कंपन्यांकडून कार्यान्वयन होत नसून, महापौर कार्यालयात दोन्ही कंपन्यांच्या विरोधात तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींना गांभीर्याने घेत, महापौर दयाशंकर तिवारी यांनी दोन्ही कंपन्यांच्या कार्यप्रणालीचा विस्तृत अहवाल सोमवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
स्वच्छता सर्वेक्षण २०२१ मध्ये नागपूर शहराची गुणवत्ता श्रेणी सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत चर्चा करण्यासाठी महापौरांनी बैठक बोलावली होती. बैठकीत ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, उपमहापौर मनिषा धावडे, स्थायी समिती अध्यक्ष वियज (पिंटू) झलके, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विधि समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम, अतिरिक्त आयुक्त संयज निपाणे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ.प्रदीप दासरवार उपस्थित होते.
बैठकीत महापौरांनी झोन आधारित कचरा संकलनाचे समीक्षण केले. शहरात ६ लाख ३१ हजार २६८ घरे आहेत, परंतु या घरांतून नियमित स्वरूपात कचरा संकलित होत नाही. केवळ ३० ते ४० टक्के कचऱ्याचेच वेगवेगळ्या प्रकारे संकलन होत आहे. या स्थितीवर महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. डम्पिंग यार्डात ओला व सुका कचरा एकत्र जात असेल, तर त्यासाठी संबंधित कंपनीवर दंड लावणे गरजेचे असल्याचे दयाशंकर तिवारी यावेळी म्हणाले. एका गाडीवर एक ड्रायव्हर व दोन कर्मचारी असायला हवेत, परंतु एका गाडीवर एक ड्रायव्हर व कर्मचारीच तैनात असल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत दटके यांनी दोन्ही कंपन्यांच्या अनियमित कारभारावर कटाक्ष केला. दोन्ही कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी दटके यांनी यावेळी केली. वीरेंद्र कुकरेजा यांनीही अनेक त्रुटी उघड केल्या. कामगार आयुक्तांसोबत बैठक लावण्याचाही निर्णय यावेळी घेतला गेला. धंतोली झोनमध्ये ९० टक्के कचऱ्याचे संकलन वेगवेगळे होत आहे.
मनपाने बोलावली कचरा गाडी
ओला आणि सुका कचरा एकसाथ संकलित होत असल्याची तक्रार मिळाल्यावर, महापौरांनी मनपा मुख्यालयात कचरा गाडी बोलावली. उपमहापौर मनिषा धावडे व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी गाडीचे निरीक्षण केले. यात एजी एन्वायरोच्या गाडीत ओल्या व कोरड्या कचऱ्याच्या मध्यात कापड लावले होते.
फाटो कॅप्शन : बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांची चर्चा करताना महापौर दयाशंकर तिवारी. सोबत विजय झलके व अन्य.
............