‘जय’ च्या चौकशीला पुन्हा वेग
By admin | Published: January 18, 2017 02:20 AM2017-01-18T02:20:10+5:302017-01-18T02:20:10+5:30
उमरेड-कऱ्हांडला येथून अचानक गायब झालेल्या ‘जय’ या वाघाची अखेर उच्चस्तरीय (केंद्रीय) चौकशी सुरू झाली आहे.
एनटीसीए सक्रिय : स्वत: ‘आयजी’ नागपुरात दाखल होणार
नागपूर : उमरेड-कऱ्हांडला येथून अचानक गायब झालेल्या ‘जय’ या वाघाची अखेर उच्चस्तरीय (केंद्रीय) चौकशी सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या २० जानेवारी रोजी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) बंगळुरु येथील विभागीय कार्यालयाचे इन्स्पेक्टर जनरल आॅफ फॉरेस्ट (आयजी) पी. एस. सोमाशेखर नागपुरात दाखल होत असल्याची माहिती पुढे आली आहे. यानंतर ते २३ जानेवारीपर्यंत नागपुरात मुक्काम ठोकणार असून, दरम्यान उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यासह नागपूर सभोवतालच्या जंगलांचा दौरा करणार आहेत. यानंतर ते आपला अहवाल दिल्ली येथील एनटीसीए मुख्यालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सादर करतील.
विशेष म्हणजे, मागील डिसेंबर महिन्यात एका चौकशी पथकाने नागपुरात पोहोचून काही लोकांचे बयान नोंदविले होते. मात्र त्याचवेळी नागपूर वन विभागाने ‘जय’ च्या प्रकरणावर वेळोवेळी वेगवेगळ्या पद्घतीने पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला आहे. कधी तो दुसरीकडे निघून गेल्याचे सांगण्यात आले, तर कधी तो एखाद्या अनोळखी व्यक्तीला दिसल्याची अफवा पसरविण्यात आली.
मात्र वन विभागाच्या या बनवाबनवीच्या खेळात ‘जय’ चा अजूनपर्यंत कुठेही सुगावा लागलेला नाही. शिवाय नागपूर वन विभागाने त्यासाठी कधीच प्रामाणिक प्रयत्न सुद्धा केलेला नाही. कदाचित यामुळेच खासदार नाना पटोले यांनी थेट संसदेत ‘जय’ चा मुद्दा उपस्थित करू न, त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. त्यावर केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री अनिल दवे यांनी ‘जय’ च्या चौकशीसाठी विशेष पथक स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) ही चौकशी सुरू केली असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
वन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
या उच्चस्तरीय चौकशीने नागपूर वन विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ‘जय’ने पर्यटकांना भुरळ घातली होती. मात्र तेवढ्याच झपाट्याने तो उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून गायब झाला. त्यामुळे ‘जय’ सोबत काय झाले असावे, हा अद्याप अनुत्तीर्ण असलेला प्रश्न आहे.