वारेगाव बंधारा फुटला, पुन्हा राखेचा महापूर; ८० एकर जमीन पाण्याखाली

By जितेंद्र ढवळे | Published: July 19, 2023 08:58 PM2023-07-19T20:58:56+5:302023-07-19T20:59:13+5:30

खापरखेडा औैष्णिक वीज प्रकल्प केंद्रालगतच वारेगाव येथील राख बंधारा बुधवारी पहाटे फुटला.

Again the deluge of ashes; Water on farmers' dreams | वारेगाव बंधारा फुटला, पुन्हा राखेचा महापूर; ८० एकर जमीन पाण्याखाली

वारेगाव बंधारा फुटला, पुन्हा राखेचा महापूर; ८० एकर जमीन पाण्याखाली

googlenewsNext

नागपूर (खापरखेडा) : खापरखेडा औैष्णिक वीज प्रकल्प केंद्रालगतच वारेगाव येथील राख बंधारा बुधवारी पहाटे फुटला. त्यामुळे लाखो टन राख मिसळेल्या पाण्याच्या लोंढ्याने ८० एकर जमीन पाण्याखाली आली. याशिवाय २० एकरातील शेतीत राखमिश्रीत मलब्याचा थर पसरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वारेगाव राख बंधारा हा कामठी तालुक्यात येतो. कोराडी आणि खापरखेडा वीज केंद्रातील राख पाईपलाईद्वारे वारेगाव येथील राख बंधाऱ्यात (ॲश बॅण्ड) साठविली जाते. वारेगाव खसाळा-मसाळा परिसरातील १५०० एकर जागेवर हा बंधारा तयार करण्यात आलेला आहे. नागपूर जिल्ह्यासह ग्रामीण भागात मंगळवारी दमदार पाऊस झाला. या पावसामुळे वारेगावचा राख बंधारा फुटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र ऐन खरीप हंगामात पऱ्हाटी आणि सोयाबीन पिकात राखेचे पाणी शिरल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले आहे.

बंधारा आणखी फुटण्याची भिती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिथे बंधारा फूटला तो आधीच कमकुवत होता. अशाच प्रकारे तीन ते चार ठिकाणी बंधारा कमकुवत स्थितीत आहे. याची आधीच तपासणी आधीच करून बंधाऱ्याची दुरुस्ती केली असती तरी ही घटना घडली नसती.

यांचे झाले नुकसान?
वारेगाव येथील ज्ञानेश्वर दिघे, नारायण दिघे, गुंडाराव भाकरे, नारायण दिघे, अरुण भाकरे, लड्डू सीरिया यांच्या शेतात राख मिश्रीत पाणी शिरल्याने पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे. वारेगवाचे सरपंच कमलाकर बांगरे यांनी बुधवारी दुपारी बंधारा फुटल्याची माहिती खापरखेडा वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिली होती.

गतवर्षी फुटला होता खसाळा बंधारा

गतवर्षी १६ जुलै रोजी कोराडी औष्णिक वीज प्रकल्प केंद्रालगतचा खसाळा राख बंधारा अतिवृष्टीमुळे फुटला होता. त्यामुळे खसाळा, मसाळा, खैरी, कवठा, सुरादेवी गावाला तडाखा बसला. यात शेकडो एकरातील पिकांचे नुकसान झाले होते. वारंवार होणाऱ्या या घटनांची चौकशी करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केली आहे.

Web Title: Again the deluge of ashes; Water on farmers' dreams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.