पुन्हा एका त्रिकुटाचा गुंतवणूकदारांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:10 AM2021-02-23T04:10:35+5:302021-02-23T04:10:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - तरुणांना रोजगार आणि गुंतवणूकदारांना महिन्याला १५ टक्के कमिशन देण्याची थाप मारून पुन्हा एका त्रिकुटाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - तरुणांना रोजगार आणि गुंतवणूकदारांना महिन्याला १५ टक्के कमिशन देण्याची थाप मारून पुन्हा एका त्रिकुटाने नागपूर तसेच ठिकठिकाणच्या गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत केले. मानकापूर ठाण्यात या प्रकरणी रोहित करण शहाणे (वय२४) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अतुल सुभाष कुलकर्णी (वय ५८), पीयूष विद्यासागर राऊत (वय २४) आणि विद्यासागर जनार्दन राऊत (वय ५४, रा.लघुवेतन कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.
जुलै २०२० मध्ये आरोपींनी कोल्हे लेआऊट, एमबी डाऊन मानकापूर येथे आपली दुकानदारी सुरू केली. आमचा गोव्यात मोठा व्यवसाय असून एसएम कंपनीच्या माध्यमातून आम्हाला बेरोजगार तरुणांची आवश्यकता असल्याची थाप मारून त्यांनी बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढले. नंतर त्यांना आमच्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना आम्ही महिन्याला १५ टक्के रक्कम कमिशन देतो, अशीही बतावणी केली. त्यांच्या या भूलथापेवर विश्वास ठेवून रोहित शहाणेसह अनेकांनी विश्वास ठेवून त्यांच्याकडे आपले २५ लाख, ८६ हजार रुपये गुंतविले. आरोपींनी गेल्या सात महिन्यात एकरुपयाही कमिशन दिले नाही उलट गुंतवणूकदारांची रोकड घेऊन त्यांनी पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी केली जात आहे.
----