नागपूर जिल्ह्यात रेती वाहतुकीचा पुन्हा एक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:22 AM2018-06-17T00:22:28+5:302018-06-17T00:22:43+5:30
सावनेर तालुक्यातील रेतीची अवैध वाहतूक दिवसेंदिवस वादग्रस्त व धोकादायक ठरता आहे. रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने मोटरसायकलला उडविले आणि त्यात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडेगाव : सावनेर तालुक्यातील रेतीची अवैध वाहतूक दिवसेंदिवस वादग्रस्त व धोकादायक ठरता आहे. रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने मोटरसायकलला उडविले आणि त्यात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
राहुल चिंतामण ढोरे (२२, रा. धपकापूर - बडेगाव, ता. सावनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. राहुल पारशिवनी येथील त्याच्या नातेवाईकाकडील लग्नसमारंभ आटोपून एमएच-४०/बीडी-९७२६ क्रमांकाच्या मोटरसायकलने धपकापूर येथे परत येत होता. तो गावाजवळ पोहोचताच माळेगाव रेतीघाटातून रेती घेऊन नागपूरच्या दिशेने वेगात जाणाऱ्या एमएच-३१/सीक्यू-६९२१ क्रमांकाच्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याच्या मोटरसायकलला उडविले. त्यात राहुल गंभीर जखमी झाला. शिवाय, ट्रकचालक ट्रकसह लगेच पळून गेला.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी राहुलला बडेगाव ेयेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्याने नागपूरला रवाना केले. मात्र, वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. परिणामी, संतप्त नागरिकांनी आंदोलनाला सुरुवात केली. माहिती मिळताच खाप्याचे ठाणेदार उल्हास भुसारी, तहसीलदार राजू रणवीर यांनी सहकाºयांसह घटनास्थळ गाठले.
रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत ठप्प होती. राहुलच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाय, पोलिसांनी या प्रकरणात काहींना ताब्यात घेतले.
स्वयंस्फूर्त ‘रास्ता रोको’
राहुलच्या मृत्यूची बातमी कळताच परिसरातील बडेगाव व धपकापूर येथील नागरिकांनी रात्री स्वयंस्फूर्तीने ‘रास्ता रोको’ केला. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. ठाणेदार उल्हास भुसारी आणि तहसीलदार राजू रणवीर यांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, नागरिक कुणाचे काहीही ऐकून घेत नव्हते. रेतीच्या अवैध वाहतुकीला महसूल विभाग जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
चौथा बळी
राहुल ढोरे हा अवैध रेतीवाहतुकीचा या भागातील चौथा बळी ठरला. यापूर्वी १ डिसेंबर २०१७ रोजी दामू बेदरे (५५, रा. बडेगाव) या शेतकऱ्याचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. अशाच प्रकारच्या अपघातात यापूर्वी दोघांचा मृत्यू झाला. या भागातील रेतीमाफिया आणि त्यांचे हस्तक गुंडगिरी करीत असल्याने त्यांच्या विरोधात मागील काही दिवसांपासून या भागात तीव्र रोष निर्माण झाला आहे. या रेतीमाफियांना राजकीय वरदहस्त आहे.
छावणीचे स्वरूप
संतप्त नागरिक कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने तसेच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्री सावनेर, केळवद, नागपूर ग्रामीण नियंत्रण कक्ष येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलावण्यात आली. शिवाय, शीघ्रकृती दलालाही पाचारण करण्यात आले. अंधारामुळे नागरिकांच्या या शांततामय आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी समयसूचकता बाळगत काहींना लगेच ताब्यात घेऊन हा प्रयत्न हाणून पाडला.
सौम्य बळाचा वापर
चिडलेल्या काही तरुणांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या दगडफेकीमुळे अचानक तणाव निर्माण झाला होता. महिला व पुरुष जागा सोडायला तयार नसल्याने शेवटी लोकमत प्रतिनिधी दीपक नारे यांनी मध्यस्थी करीत संतप्त तरुणांना शांत केले. गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे शनिवारी सायंकाळपर्यंत या भागात तळ ठोकून होते.