अग्रवाल, मेहता पोलिसांच्या ताब्यात
By admin | Published: May 16, 2016 03:04 AM2016-05-16T03:04:08+5:302016-05-16T03:04:08+5:30
मारहाणीची तक्रार करून पोलीस कस्टडीतून सुटका करून घेऊ पाहणाऱ्या नीरज अग्रवाल आणि निमित मेहताला रविवारी गुन्हेशाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.
सट्टेबाजीचा डब्बा : खासगी सायबर तज्ज्ञांची मदत
नागपूर : मारहाणीची तक्रार करून पोलीस कस्टडीतून सुटका करून घेऊ पाहणाऱ्या नीरज अग्रवाल आणि निमित मेहताला रविवारी गुन्हेशाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांना कोर्टात हजर करून त्यांचा १९ मे पर्यंत पीसीआर मिळवला. दरम्यान, हजारो कोटींच्या सट्टेबाजीचा डब्बा फोडण्यासाठी पोलिसांनी तीन खासगी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली आहे.
गुरुवारी पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली होती. दुसऱ्या दिवशी नीरज (रवीचा भाऊ) आणि निमित (मदतनीस) या दोघांनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप लावून न्यायालयीन कस्टडीचा मार्ग धरला. मात्र, मेडिकलमधील डॉक्टरांकडून या दोघांना कसलीही मारहाण झाल्याचे दिसत नसल्याचा अहवाल आज कोर्टात सादर करण्यात आला. त्यानंतर या दोघांना कोर्टाने १९ मे पर्यंत पीसीआर मंजूर केला.
दरम्यान, रवी अग्रवालच्या मुंबईतील कार्यालयात धाड घालून जप्तीची कारवाई करणारे गुन्हेशाखेचे पथक सोमवारी नागपुरात परत येणार आहे. दुसरीकडे मुंबई आणि नागपुरात जप्त करण्यात आलेल्या हार्डडिस्कमधील सांकेतिक व्यवहाराची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी तीन खासगी सायबर तज्ज्ञांना मानधन तत्वावर मदतीला घेतले आहे. हे सायबर तज्ज्ञ डब्बा व्यापाराच्या कोट्यवधींच्या व्यवहाराचा छडा लावण्यासाठी पोलिसांना मदत करीत आहेत. काही सनदी लेखापालही हिशेबाची जुळवाजुळव करीत आहेत.(प्रतिनिधी)