नागपुरातील अग्रवाल तिहेरी हत्याकांड : ज्यांनी वाचवले प्राण त्यांचाच घेतला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 02:58 PM2022-01-20T14:58:49+5:302022-01-20T18:19:25+5:30
आरोपी मदन अग्रवाल याने कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
नागपूर : पत्नी आणि मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या करणारा मदन अग्रवाल याने कर्जबाजारीपणाला कंटाळून यापूर्वी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याच्या पत्नी आणि मुलांनी त्याचा जीव वाचवला होता. तो काळ बनून आपला जीव घेईल अशी या बिचाऱ्यांना त्यावेळी साधी कल्पनाही नव्हती. त्यांनी केलेली कृती त्यांच्यासाठीच जीवघेणी बनली आणि क्रूरकर्मा मदनने पत्नी व दोन मुलांची निर्घृण हत्या केली.
जरीपटक्यातील दयानंद पार्कजवळ घडलेल्या थरारक तिहेरी हत्याकांडातील हा करुणाजनक पैलू बुधवारी उघड झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी मदन अग्रवाल याने कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पहिल्या वेळी त्याने विषारी गोळ्या खाल्ल्या होत्या तर दुसऱ्या वेळी त्याने विष पिले. मात्र दोन्ही वेळेस कुटुंबियांनी त्याला तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्याचा जीव वाचला.
सोमवारी आणि मंगळवारी रात्रीच्या दरम्यान मदनने पत्नी किरण तसेच ऋषभ आणि टिया ऊर्फ तोषिता या तिघांची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली आणि स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार उघड झाल्यापासून परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, आज बुधवारी मेयो इस्पितळात या चौघांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुटुंबीयांजवळ व्यक्त करायचा हतबलता
कर्जात आकंठ बुडाल्यामुळे कर्जदार वसुलीसाठी तगादा लावत आहेत, त्यांनी जगणे हराम केले, असे मदन त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सांगायचा, यातून कशाप्रकारे सुटका होईल अशी विचारणाही करायचा. शेवटी त्याने स्वतःच कुटुंबीयांसह स्वतःचाही खात्मा करून कर्जाच्या कटकटीतून आपली सुटका करून घेतली.