८० व्या वर्षी लीलाबाई यांनी केली काेराेनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:08 AM2021-05-08T04:08:46+5:302021-05-08T04:08:46+5:30
नागपूर : काेराेना संक्रमणाच्या विचाराने प्रत्येकामध्ये भयकंप शिरला आहे. दरराेज एखाद्या परिचित व्यक्तीच्या मृत्यूची धास्ती प्रत्येकामध्ये आहे. यात तरुण ...
नागपूर : काेराेना संक्रमणाच्या विचाराने प्रत्येकामध्ये भयकंप शिरला आहे. दरराेज एखाद्या परिचित व्यक्तीच्या मृत्यूची धास्ती प्रत्येकामध्ये आहे. यात तरुण रुग्णांची संख्यासुद्धा अधिक आहे. मात्र, हा जीवघेणा आजार ओढवला तरीही प्रबळ इच्छाशक्ती व मजबूत मनाेधैर्याने कठीण परिस्थितीचा सामना करता येऊ शकताे. ८० व्या वर्षी काेराेनावर यशस्वी मात करून घरी परतलेल्या लीलाबाई रामटेके यांनी हेच दाखवून दिले आहे.
मध्ये रेल्वे, नागपूर मंडळाच्या मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात संरक्षण विभागात सेवारत संजय रामटेके यांची आई लीलाबाई या काेराेना संक्रमित झाल्या हाेत्या. त्यांचा एचआरसीटी स्काेअर २५ पैकी २० आढळला हाेता. त्यांना तत्काळ ऑक्सिजन बेडची गरज हाेती. शहरातील एकाही खाजगी रुग्णालयात त्यावेळी बेड उपलब्ध हाेऊ शकला नाही. अशा गंभीर परिस्थितीत संजय यांनी २१ एप्रिल राेजी आईला रेल्वे रुग्णालयात दाखल केले. संक्रमण बरेच वाढले असतानाही लीलाबाई यांनी हिंमत खचू दिली नाही. इच्छाशक्ती, ध्यानसाधना, प्राेटीनयुक्त आहार व रेल्वे रुग्णालयातील डाॅक्टरांच्या याेग्य उपचाराने त्यांनी काेराेना पराजित केले. रिपाेर्ट निगेटिव्ह आल्यानंतर शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. लीलाबाई आता मुले प्रकाश व संजय रामटेके यांच्या घरी सुखरूप परतल्या आहेत. संजय यांनी मंडळ रेल्वे रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. चंपक बिस्वास, सर्व डाॅक्टर्स, नर्सेस पॅरामेडिकल स्टाॅफ तसेच वरिष्ठ मंडळ संरक्षण अधिकारी ए.बी. दाभाडे, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे कार्यकारी अध्यक्ष हबीब खान, मंडळ अध्यक्ष देबाशीष भट्टाचार्य, प्रशासनिक शाखा अध्यक्ष राहुल गजभिये, सचिव मनाेज मनाेज चाैथानी व इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
काेराेना रुग्णांना केले आवाहन
लीलाबाई यांनी चांगल्या उपचारासाठी रेल्वे रुग्णालयाच्या डाॅक्टर व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. संक्रमित रुग्णांनी काेराेनाची भीती बाळगू नये, हिंमत खचू देऊ नये, मनाला शांत ठेवावे, याेग्य आहार घ्या, ध्यान करा, डाॅक्टरांवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला आहे. सकारात्मक राहिल्याने काेराेनावर मात करणे शक्य आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.