ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा आता ६० वर्ष : धोरण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 09:28 PM2018-07-11T21:28:04+5:302018-07-11T21:29:59+5:30

ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक उन्नती आणि उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले असून त्याच्या चोख अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा ६५ वरून आता ६० वर्षे करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी येथे दिली.

Age limit for senior citizens now 60 years: Policy announcement | ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा आता ६० वर्ष : धोरण जाहीर

ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा आता ६० वर्ष : धोरण जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्देप्रभावी अंमलबजावणीसाठी बडोले यांचे निर्देश


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक उन्नती आणि उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले असून त्याच्या चोख अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा ६५ वरून आता ६० वर्षे करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी येथे दिली.
मंगळवारी विधानसभेत यासंदर्भात उपस्थित लक्षवेधी सूचनेवरील उत्तरात त्यांनी यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमित केल्याचे सांगितले होते. याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते रविभवन येथील आपल्या शासकीय निवासस्थानी बोलत होते. ते म्हणाले, ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित रुग्णालयांमध्ये ज्येष्ठांसाठी पाच टक्के खाटांची सोय ठेवण्यात आली असून शासकीय रुग्णालयात त्यांना प्राध्यान्यक्रम देण्यात येणार आहे. खासगी वैद्यकीय संस्था, रुग्णालये, ट्रस्टांनी ज्येष्ठ रुग्णांना ५० टक्के सवलत देण्याचे तसेच खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी ज्येष्ठांना फी मध्ये सवलत द्यावी असे निर्देश दिले असल्याचेही बडोले यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात वृद्ध चिकित्सा या मुद्याचा समावेश करण्यात आला असून वैद्यकीय सेवा व मानसशास्त्रीय उपचार आणि समुपदेशन करण्यासाठी व्यावसायिक अथवा सामाजिक कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. निराधार व्यक्तींच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. तसेच त्यांना अंत्योदय योजनेच्या दराने धान्य देण्यात येणार असून त्यांना जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येईल, रुग्णालयात ज्येष्ठ नागरिक चिकित्सा विभाग व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र स्वागत कक्ष स्थापण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
स्वयंसेवी संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा व अ‍ॅम्ब्युलन्स सेवा तसेच मोफत डायलिसिस सेंटर उभारावेत, तसेच आरोग्य विभागाने रेडियो, टी.व्ही. मार्फत ज्येष्ठांचे आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित करावे असे निर्देश दिले. आयकर, प्रवास व इतर बाबतीत मिळणाºया सवलतीप्रमाणे महानगरपालिका, नगरपालिकेच्या करातही ज्येष्ठांना सवलत देण्यात यावी यासाठी नगरविकास विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे नवीन ज्येष्ठ नागरिक धोरणामुळे राज्यातील वृद्धांना सामाजिक सुरक्षा निर्माण होईल आणि त्यांचे अनुभव, ज्ञान आणि कौशल्याचा भावी पिढीच्या विकासासाठी लाभ होईल, असा विश्वास बडोले यांनी व्यक्त केला.

गृहनिर्माणच्या आराखड्यात ज्येष्ठांचा विचार
गृहनिर्माण संस्थांचे आराखडे मंजूर करतानाच ज्येष्ठांसाठी बहुउद्देशीय केंद्रे, पाश्चात्त्य शैलीची सुलभ स्वच्छतागृहे, न घसरणाऱ्या फरशा, पकडदांडा असलेली स्नानगृहे, स्वच्छतागृहे, आदी बाबींच्या अटी बंधनकारक असतील तसेच निवासी व अनिवासी संकुलात वृध्दाश्रमासाठी अतिरिक्त एफएसआय देण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात चार वृध्दाश्रमासाठी जागा राखून ठेवण्यात येतील. तसेच नगर विकास विभागाने नवीन टाऊनशीप अथवा मोठ्या संकुलास परवानगी देताना त्यांना वृध्दाश्रम स्थापण्याची सक्ती करणे, तेथे ज्येष्ठ ग्राहकांना तळमजल्यावर घर अथवा गाळे द्यावेत, असे निर्देश नगर विकास विभागास दिल्याचेही बडोले यांनी यावेळी सांगितले.

सुरक्षेसाठी हेल्पलाईन
ज्येष्ठ नागरिकांचा विविध स्तरातून होणाºया छळाला रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हेल्पलाईन सुरू करून आणीबाणीच्या वेळी त्यांना तात्काळ आरोग्य सेवा आणि सुरक्षेची मदत उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करावी, तसेच मोबाईल अलार्म, इंटरनेट, जीपीएस सारखी आपत्कालीन सतर्क यंत्रणा उभारण्याबाबत आणि एकाकी राहणाºया ज्येष्ठ नागरिकांची अद्ययावत यादी तयार करून पोलीस प्रतिनिधीने सामाजिक कार्यकर्त्यांसोबत महिन्यातून एकदा त्यांची भेट घ्यावी, तसेच पालकांचा सांभाळ न करणाºया डिफॉल्टर पाल्यांची यादी तयार करून त्याला व्यापक प्रसिध्दी देण्याच्या सूचनाही गृह विभागाला करण्यात आल्याचे बडोले म्हणाले.

ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी समिती
ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीची स्थापना करून राज्यस्तर, जिल्हास्तर तसेच महानगरपालिका, नगरपालिका स्तारवर समित्यांचे गठण करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक उपविभागात संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निर्वाह प्राधिकरण निर्वाह स्थापन करण्यात आले असून आईवडिलांची व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थाची निगा राखण्यात येईल.

शालेय अभ्यासक्रमात मूल्यांचा समावेश
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांची जाणीव होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात मूल्य शिक्षणात ज्येष्ठांविषयी आदरभाव, परस्पर सहकार्य, बंधूभाव, प्रेम, इत्यादी पोषक मूल्यांचा समावेश करण्याबाबत शालेय शिक्षण विभागालाही सांगण्यात आले आहे.

Web Title: Age limit for senior citizens now 60 years: Policy announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.