विखारी प्रचार विरोधकांचा अजेंडा, माझा धर्म मानवतेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 10:30 AM2020-11-28T10:30:54+5:302020-11-28T10:45:13+5:30
Nagpur News माझा पिंडच समाजकारणाचा आहे. यासाठी माझे प्रेरणास्थान केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आहेत. त्यांच्या एका वाक्याचा माझ्या जीवनावर प्रचंड प्रभाव आहे. ते नेहमी म्हणतात, राजकारणी व्यक्तीने ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून नागपूरचे विद्यमान महापौर संदीप जोशी हे रिंगणात आहेत. राजकारणापेक्षा सामाजिक कार्यामुळेच ते चर्चेत राहिले आहे. पदवीधरांसाठी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी त्यांचा अजेंडा, नागपूर शहराच्या विकासात त्यांनी बजावलेली भूमिका, माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी मतभेदावरून होत असलेला प्रचार आदी मुद्यांवर त्यांनी ''लोकमत''शी मनमोकळी चर्चा केली.
प्रश्न : तुम्ही राजकीय क्षेत्रात असूनही सामाजिक कार्यासाठीच ओळखले जाता, असे का ?
संदीप जोशी : माझा पिंडच समाजकारणाचा आहे. यासाठी माझे प्रेरणास्थान केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आहेत. त्यांच्या एका वाक्याचा माझ्या जीवनावर प्रचंड प्रभाव आहे. ते नेहमी म्हणतात, राजकारणी व्यक्तीने ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करावे. नितीनजींच्या या वाक्यानेच माझं आयुष्य बदलविलं. समाजातील अनेक घटना मला अस्वस्थ करून जातात आणि या अस्वस्थतेतूनच माझ्या हातून अनेक कार्य घडून जाते. दीनदयाल थाली हा अशाच अस्वस्थतेतून जन्माला आलेला प्रकल्प आहे. आज सुमारे १२०० रुग्ण नातेवाईक केवळ १० रुपयात आपली भूक भागवितात. दीनदयाल रुग्ण सेवा प्रकल्प, आरोग्य शिबिर, सोनेगाव तलावाचे खोलीकरण, वंचितांची दिवाळी हे याच अस्वस्थेतून निर्माण झालेले आणि तडीस गेलेले कार्य आहे.
प्रश्न : भाजप आणि ओबीसी या मुद्यांवर आपण काही सांगू शकाल?
संदीप जोशी : भारतीय जनता पार्टी हा विशिष्ट जातीच्या व्यक्तींचा पगडा असलेला पक्ष आहे, असा भ्रम विरोधी पक्षांकडून समाजात पसरवला गेला आहे. भाजप व्यक्तीच्या कर्तृत्वाला न्याय देतो. भाजपने प्रत्येक जाती, धर्माच्या व्यक्तीला पक्षात सामावून घेतले आहे. कर्तृत्वानुसार पद दिले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ओबीसी आहेत. महाराष्ट्रात भाजपचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ओबीसींसाठी पहिल्यांदा अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन करून ओबीसी विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला.
प्रश्न : तुमचा आणि तुकाराम मुंढे यांच्यातील नेमका वाद काय?
संदीप जोशी : नागपूर मनपाचे यापूर्वीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मी कधीही वैयक्तिक विरोध केला नाही. ते माझे आजही चांगले मित्र आहेत. कामाच्या बाबतीत त्यांची दिशा आणि माझी दिशा एकच होती. फक्त अंमलबजावणी आणि धोरणासंदर्भात माझा त्यांना विरोध होता. शासन आणि प्रशासन ही एका रथाची दोन चाके आहेत. मात्र, त्यांनी जी ‘एकला चलो रे’ भूमिका स्वीकारली होती, त्याला मी विरोध केला. मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकच नव्हे तर सर्वच पक्षाचे नेतेही नाराज होते. कुठल्याही अधिकाऱ्याची बदली राज्य सरकार करते. त्यामुळे त्यांच्या बदलीमागे मी होतो, असे म्हणणे चुकीचे आहे.
प्रश्न : महापालिकेत आपण काय महत्त्वाची कामे केलीत?
संदीप जोशी : नगरसेवक म्हणून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेत पाऊल टाकले. पक्षनेतृत्वाने विश्वास टाकत सलग दोन वर्षे माझ्यावर स्थायी समिती सभापतींची जबाबदारी टाकली. या काळात अनेक रेंगाळलेल्या प्रकल्पांना निधीची तरतूद करून गती दिली. सिमेंट रस्ते असो, कविवर्य सुरेश भट सभागृह, सुदर्शन धाम असो आज जे प्रत्यक्षात उतरले आहे, असे सर्व प्रकल्प त्या काळात मंजूर केले. नागपूर शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या ‘नागपूर महोत्सवा’ची सुरुवातही त्याच काळात केली. महापौर पदाच्या काळात कोरोनामुळे अल्प काळ काम करता आले. संपूर्ण महापौर निधीतून शहरात स्वच्छतागृहे बनविण्याचा धाडसी निर्णय घेतला. ‘मम्मी पापा यू टू’, ‘माय लव्ह माय नागपूर’ असे लोकसहभागाचे उपक्रम राबविले.
प्रश्न : आपल्या विरोधात सोशल मीडियाचा आधार घेत विखारी प्रचार सुरू आहे, यावर आपण काय म्हणाल?
संदीप जोशी : ही निवडणूक आहे आणि हे राजकारण आहे. ज्यांच्याजवळ सांगण्यासारखे काही नाही ते प्रबळ उमेदवाराच्या चारित्र्यावर आणि हेतूवर शिंतोडे उडविण्याचे काम करीत असतात. माझ्याजवळ सांगण्यासारखे बरेच आहे. मी कुणाचे वाईट घेऊन लोकांसमोर जाणार नाही. हा मतदारसंघ सूज्ञ, शिक्षित लोकांचा आहे. विखारी प्रचाराने माझे महत्त्व कमी होत नाही. गौतम बुद्धाच्या शांततेच्या मार्गाचा मी अनुयायी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मानवधर्माला मी मानणारा आहे. सर्व जाती, धर्म माझ्यासाठी समान आहे. संत गाडगेबाबांच्या विचारांचा मी पाईक आहे. त्यामुळे विरोधकांच्या विखारी प्रचाराला, वैयक्तिक टीकेला उत्तर देण्यापेक्षा आपण आपले कार्य करत राहावे, मी त्यांच्यावर वैयक्तिक टीका मुळीच करणार नाही, अशीच माझी भूमिका आहे. मी हा विषय मतदारांवरच सोडला आहे.
प्रश्न : पदवीधर मतदारसंघात भाजप केवळ विशिष्ट जातीच्या व्यक्तीलाच तिकीट देतो, हे खरे आहे काय?
संदीप जोशी : खरे तर पदवीधरांच्या मतदारसंघात असे गलिच्छ आरोप करणे चुकीचेच आहे. या मतदारसंघात मा. मोतीरामजी लहाने, आमचे ज्येष्ठ नेते रामजीवनजी चौधरी, गंगाधरराव फडणवीस, नितीनजी गडकरी, प्रा. अनिलजी सोले आदींनी प्रतिनिधित्व केले आहे. अशा दिग्गजांनी नेतृत्व केलेल्या मतदारसंघाच्या निवडणुकीत एखाद्या पक्षावर असे आरोप योग्य नाही.
प्रश्न : पदवीधरांसाठी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी आपला अजेंडा काय?
संदीप जोशी : पदवीधरांचे अनेक प्रश्न आहे. युवा पदवीधरांचे प्रश्न वेगळे, पदवी मिळून अनेक काळ लोटलेल्या लोकांचे प्रश्न वेगळे, निवृत्त झालेल्यांचे प्रश्न वेगळे आहेत. पदवी मिळूनही बेरोजगारीसारख्या मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. कौशल्य विकास, रोजगार मेळावे, मोठमोठ्या कंपन्या आणि बेरोजगार यांच्यामधील सेतू बनून नोकरी मिळवून देण्याचे प्रयत्न करणे, हे आपल्या अजेंड्यावर आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ लघु उद्योग उभारण्यासाठी मिळवून देणे, त्याची एक स्वतंत्र यंत्रणा तयार करणे, हे आपल्या अजेंड्यावर आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे. २००५ नंतरच्या शिक्षकांचा पेन्शनचा प्रश्न आहे. विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या समस्या आहेत. या प्रश्नांना आम्ही अजेंड्यावर घेतले आहे. माझ्या संकल्पनाम्यात वरील सर्व उल्लेख आहे. संकल्पना खूप आहेत. व्हिजन क्लिअर आहे. त्याची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार आहे. मतदारांनी एकदा विश्वास टाकावा. ही ‘ब्ल्यू प्रिंट’ वास्तवात उतरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.