नागपुरातील गुन्हे शाखेत गुन्हेगारांचे एजंट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:18 AM2019-02-13T11:18:11+5:302019-02-13T11:21:05+5:30

कुख्यात ड्रग्ज माफिया आबूला अटक केल्यानंतर चक्क दोन डझन पोलीसवाले (अधिकारी, कर्मचारी) एजंटसारखे एकट्या आबूच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती उजेडात आली आहे.

Agent of criminals in crime branch itself in Nagpur! | नागपुरातील गुन्हे शाखेत गुन्हेगारांचे एजंट!

नागपुरातील गुन्हे शाखेत गुन्हेगारांचे एजंट!

Next
ठळक मुद्देबचावासाठी बनवाबनवी अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण राजकारण

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध धंदे करणाऱ्यांवर तसेच गुन्हेगारांवर जरब बसविण्याची जबाबदारी गुन्हे शाखेवर असते. त्याचप्रमाणे घडलेल्या गुन्ह्यांचा तातडीने छडा लावून गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्याचीही जबाबदारी गुन्हे शाखेवरच असते. मात्र, याच गुन्हे शाखेत गुन्हेगारांच्या एजंटसारखे वागणारे पोलीस भरले असेल तर काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. कुख्यात ड्रग्ज माफिया आबूला अटक केल्यानंतर चक्क दोन डझन पोलीसवाले (अधिकारी, कर्मचारी) एजंटसारखे एकट्या आबूच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. विशेष म्हणजे, एजंटसारखीच गुन्हेगारांच्या नियमित संपर्कात असलेल्या वादग्रस्त पोलिसांना वाचविण्याची कसरत गुन्हे शाखेतील काही अधिकाऱ्यांनी चालवली आहे. त्यासाठी ते शहर पोलीस दलाच्या शीर्षस्थ अधिकाºयांना दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचीही धक्कादायक बाब चर्चेला आली आहे.
कोणत्याही ठिकाणच्या पोलीस दलाचा कणा म्हणजे तेथील गुन्हे शाखा मानली जाते. माणसाचा कणा ताठ असेल तर शरीर मजबूत असल्याचे मानले जाते. त्याचमुळे जागोजागच्या गुन्हे शाखेला अधिकाधिक मजबूत बनविण्याचे प्रयत्न तेथील वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत असतात. राज्यात मुंबईनंतर सर्वाधिक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य तसेच येण्याजाण्याचे शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेले शहर म्हणूनही नागपूरची ओळख असून, कोट्यवधींची खयवाडी करणारे मॅच फिक्सर, बुकी, एकाच दिवशी कोट्यवधीचा हवाला करणाºयांचे शहर म्हणूनही नागपूर ओळखले जाते. थेट मुंबई अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांशी आणि देश-विदेशातील ड्रग्ज माफियांशी संबंध ठेवणाऱ्या गुन्हेगारांचे शहर म्हणूनही नागपूर ओळखले जाते. त्यामुळे येथील पोलीस दल अधिकाधिक मजबूत बनविण्यावर सरकार आणि येथील पोलीस आयुक्त भर देतात.
सहा महिन्यांपूर्वी नागपुरात रुजू झालेले पोलीस आयुक्त डॉॅ. भूषणकुमार उपाध्याय यांनीही शहरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारांचे नेटवर्क मोडून काढण्याचे कसोशीने प्रयत्न चालविले आहेत. नागपूरला गुन्हेगारीमुक्त आणि सुरक्षित शहर बनविण्यासाठी त्यांनी सर्व वरिष्ठ अधिकारी, ठाणेदार आणि गुन्हे शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना पूर्णत: स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, त्याचा येथील गुन्हे शाखेतील काही अधिकाऱ्यांनी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी पुरता गैरवापर चालविल्याची चर्चा खुद्द पोलीस दलातच उघडपणे सुरू आहे. अडीच-तीन वर्षांपूर्वी येथील गुन्हे शाखेचे पोलीस (अधिकारी आणि कर्मचारी) तीन वेगवेगळ्या गटात विभागले गेले होते. त्यामुळे गुन्हे शाखेची पुरती वाट लागली होती. शहरातील गुन्हेगारी उफाळून आली असताना, ती मोडून काढण्याची तसेच गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्याची ज्यांची जबाबदारी आहे, त्या गुन्हे शाखेतील पोलीस डिटेक्शनपेक्षा कलेक्शनवर जास्त जोर देत होते. त्यामुळे गुन्हे शाखेत कलेक्शन पथके निर्माण झाल्याची जोरदार टीकाही झाली होती. अखेर वरिष्ठांना जाग आली आणि त्यांनी गुन्हे शाखेत कलेक्शन पथकाला टाईट करून डिटेक्शनवर जोर देण्याची तंबी दिली. त्यामुळे गुन्हे शाखेची गाडी रुळावर आली. गेल्या दोन वर्षांत गुन्हे शाखेने धाडसी कारवाई केली नसली तरी बºयापैकी कारवाया केल्या आहेत. त्यातल्यात्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट आणि अमली पदार्थ विकणाऱ्यांवर एनडीपीएस सेलने पकड मजबूत करण्यात यश मिळवले आहे. मात्र, याच एनडीपीएस सेलने काही दिवसांपूर्वी एमडी पावडरची लत लागलेल्या धनिक मंडळींना गुन्हे शाखेत बोलवून त्यांच्याकडून केलेली लाखोंची वसुलीही चर्चेला आली होती. वरिष्ठांच्याही ती कानावर गेली. वसुली वाढल्याच्या तक्रारी झाल्यामुळे एनडीपीएस सेलची मक्तेदारी संपवून ती दोन पथकात विभाजित करण्यात आली. यातील एका पथकाने मध्य भारतातील कुख्यात ड्रग्ज माफिया आबू फिरोज खान याच्या मुसक्या बांधल्या. तत्पूर्वीच त्याच्या काही साथीदारांनाही अटक केली. त्यावेळी आबूकडून २५ पेटीची मांडवली करून त्याला बाजूला ठेवल्याचीही ओरड झाली होती. मात्र, आबूच्या अटकेनंतर ती ओरड थांबली आणि पुढच्या तपासात आबूच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या दोन याद्यांनी पुन्हा एकदा खळबळ निर्माण केली. पहिली लिस्ट एमडी खरेदी करणाऱ्यांची होती. ती संबंधितांना लॉटरी लागल्याची सुखद अनुभूती देऊन गेली. दुसरी लिस्ट पोलीस दलाला भूकंपासारखा झटका देणारी ठरली. कारण या लिस्टने आबूच्या नियमित संपर्कात असलेल्या, त्याच्याकडून घातक एमडी (अंमली पदार्थ) आणि महिन्याला मोठ्या रकमेचा हप्ता घेणाऱ्यांचा भंडाफोड केला. अर्ध्या डझनपेक्षा जास्त पोलीस उपनिरीक्षक, काही एपीआय, काही पीआय आणि अनेक पोलीस कर्मचारी असे तब्बल २९ जण आबूच्या संपर्कात असल्याचे आणि या २९ पैकी २४ जण नियमित संपर्कात असल्याचे ‘कॉल डिटेल्स’मधून उजेडात आल्याचे सांगितले जाते.

कुणी मायचा, कुणी मावशीचा
पोलीस दलात राहून, सरकारचा पगार घेऊन अनेक पोलीस अधिकारी-कर्मचारी आबू तसेच अन्य कुख्यात गुन्हेगारांची अजूनही अनेक जण चाकरी करीत असल्याची तसेच त्याची गुन्हे शाखेतील बहुतांश अधिकाऱ्याला माहिती असल्याचीही चर्चा आहे. मात्र, मोठा मलिदा मिळत असल्याने तसेच त्यांच्यावर कारवाई झाल्यास आपली पोलखोल होऊ शकते, या धाकामुळे डिफॉल्टर लिस्ट दडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. याउलट ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांच्या सांगण्यावरून एखाद्या कुख्यात गुन्हेगाराला पकडण्यासाठी दुसऱ्या एखाद्या गुन्हेगाराला ‘आॅन रेकॉर्ड’ संपर्क केला होता, त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची शिफारस करून वरिष्ठांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले जात आहे.

डिफॉल्टर अन् डॅमेज कंट्रोल
आबूच्या एजंटसारखे काम करणाऱ्या या २४ जणांपैकी हुडकेश्वर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नीलेश पुरभे, सक्करदऱ्यातील उपनिरीक्षक मनोज ओरके, तहसीलमधील शरद शिंपणे आणि साजीद मोवाल हे चार पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी जयंता शेलोट आणि श्याम मिश्रा या सहा जणांना ५ फेब्रुवारीला निलंबित करण्यात आले. या सहा जणांपैकी कुणी आबूला महिन्यातून ३० वेळा तर कुणी ३०० वेळा कॉल करीत होते, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे अधिकारी सांगतात. अन्य एजंट कम पोलीस (जे गुन्हे शाखेत लाडके म्हणून ओळखले जातात) बिनधास्त वसुलीभाईची भूमिका वठवीत आहेत.

Web Title: Agent of criminals in crime branch itself in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.