नागपुरात एजंटचा कंपनीला गंडा : २३ लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:31 AM2018-10-20T00:31:37+5:302018-10-20T00:32:13+5:30
शेतीसंबंधी साहित्याची विक्री करून त्यातून आलेले सुमारे २३ लाख रुपये एका एजंटने हडपले. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतीसंबंधी साहित्याची विक्री करून त्यातून आलेले सुमारे २३ लाख रुपये एका एजंटने हडपले. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. नंदकिशोर घरघारे (रा. साईनगर, खरबी) याच्या तक्रारीनुसार, ते नागपुरातील एका शेतीपयोगी साहित्याची विक्री करणाऱ्या एका कंपनीत मार्केटिंग व्यवस्थापक आहेत. त्यांनी सतना नागोर (मध्य प्रदेश) मधील शैलेश चतुर्वेदीला कंपनीचा एजंट म्हणून नियुक्त केले होते. शैलेशने ८ डिसेंबर २०१७ ते २९ मे २०१८ दरम्यान कंपनीकडून २२ लाख, ९६ हजारांचे साहित्य मध्य प्रदेशात नेले. तेथे ते दुकानदारांना विकले आणि त्याची रक्कम परस्पर हडप केली. दरम्यान, त्याने नेलेल्या साहित्याची रक्कम वसूल करण्यासाठी कंपनीकडून वारंवार शैलेशचा शोध घेण्याचा त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याने दाद दिली नाही. त्यामुळे घरघारे यांनी अखेर प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपी शैलेशचा शोध घेतला जात आहे.