गिट्टी गौण खनिजाच्या व्याख्येत मोडत नाही
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: July 17, 2024 04:13 PM2024-07-17T16:13:20+5:302024-07-17T16:15:02+5:30
हायकोर्टाचा निर्णय : पीडिताला भरपाईची परवानगी
राकेश घानोडे
नागपूर : गिट्टी हे दगडापासून तयार केलेले उत्पादन आहे. गिट्टीचा गौण खनिजामध्ये समावेश होत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तहसीलदारांनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करताना विनोद मनीयार यांचा गिट्टी वाहून नेणारा ट्रक जप्त केला होता. त्यामुळे मनीयार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यावर हा निर्णय देऊन मनीयार यांचा ट्रक व गिट्टी परत करण्याचा आदेश तहसीलदारांना दिला. दरम्यान, मनीयार यांचे वकील ॲड. अनुप ढोरे यांनी या अवैध कारवाईमुळे संबंधित ट्रक २० महिन्यांपासून निरुपयोगी पडून आहे, परिणामी मनीयार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले आणि तहसीलदारांना नुकसान भरपाई मागण्याची परवानगी देण्याची विनंती केली. न्यायालयाने ती विनंतीही मंजूर केली.