वीज बिलाविरुद्ध आंदोलन : मनसेने काळे कपडे घालून वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 08:50 PM2020-07-20T20:50:38+5:302020-07-20T21:03:48+5:30
वाढीव वीज बिलाविरुद्धचा असंतोष वाढत आहे. सोमवारी वीज बिलाविरुद्ध विदर्भवाद्यांनी मंत्र्यांचे पुतळे जाळले तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून ऊर्जामंत्र्यांना निवेदन सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढीव वीजबिलाविरुद्धचा असंतोष वाढत आहे. सोमवारी वीजबिलाविरुद्ध विदर्भवाद्यांनी मंत्र्यांचे पुतळे जाळले तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून ऊर्जामंत्र्यांना निवेदन सादर केले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने वीज बिल रद्द करण्याच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलन केले. यादरम्यान मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन केले. युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासूरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊन काळातील संपूर्ण वीज बिल रद्द करून विदर्भातील नागरिकांना वीज बिलातून मुक्त करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून ऊर्जामंत्र्यांना निवेदन सादर केले. ऊर्जा गेस्ट हाऊस येथे कार्यकर्ते काळे कपडे घालून पोहोचले. प्रदेश महासचिव हेमंत गडकरी आणि वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष अतुल वंदिले यांनी यावेळी १६ टक्के विद्युत शुल्क व स्थिर शुल्क माफ करण्याची मागणी केली. निवेदनात मध्य प्रदेशच्या धर्तीवर वीज ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी केली. यावर ऊर्जामंत्री राऊत यांनी केंद्र सरकारकडून मदत मिळत नसल्याने महाराष्ट्राला दिलासा देता येत नसल्याचे सांगितले. शिष्टमंडळात अमोल बोरकर, रमेश घघारे, सुनील भुते, अमोल मुढे, योगेश चनापे, श्याम पुनियानी, नरेश भोयर, राजू सिन्हा, उमेश नेवारे, गजानन कलोडे, सचिन इंगोले आदींचा समावेश होता.