मनपा आयुक्तांच्या विरोधातील आंदोलन बारगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:51 PM2020-07-07T23:51:41+5:302020-07-07T23:54:17+5:30
स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर यांना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून अपमानास्पद वागणूक देऊन छळ होत असल्याच्या विरोधात मंगळवारी दुपारी महापालिका मुख्यालयापुढे महिला निदर्शने करणार होत्या. १५-२० महिला मनपा मुख्यालय परिसरात पोहोचल्या. परंतु कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्याने व पोलिसांनी त्यांना निघून जाण्यात सांगितल्याने निदर्शने न करताच महिला परतल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर यांना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून अपमानास्पद वागणूक देऊन छळ होत असल्याच्या विरोधात मंगळवारी दुपारी महापालिका मुख्यालयापुढे महिला निदर्शने करणार होत्या. १५-२० महिला मनपा मुख्यालय परिसरात पोहोचल्या. परंतु कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्याने व पोलिसांनी त्यांना निघून जाण्यात सांगितल्याने निदर्शने न करताच महिला परतल्या.
आयुक्त मुंढे यांच्याकडून महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ होत असल्याच्या विरोधात महिलांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास महापालिका मुख्यालयापुढे निदर्शने केली जाणार होती. याबाबतचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मनपा मुख्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावला होता. गेटवर विचारपूस केल्यानंतरच लोकांना कार्यालयात सोडले जात होते, तर काही आंदोलक महिलांना मुख्य गेटबाहेरच पोलिसांनी रोखले. कोरोना संसर्ग लक्षात घेता फिजिकल डिस्टन्स ठेवून आंदोलन करण्याच्या सूचना आंदोलकांना देण्यात आल्या. परंतु आंदोलकांची संख्या मोजकीच होती, त्यात पोलीस बंदोबस्त यामुळे निदर्शने न करताच महिला परतल्या.