मंगळवारी तलाव सौंदर्यीकरणासाठीच्या आंदोलनाची मनपाकडून दखलच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:12 AM2021-08-15T04:12:01+5:302021-08-15T04:12:01+5:30
नागपूर : मंगळवारी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी आपच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. पाच दिवसांपासून आंदोलन सुरू असूनही अद्याप महानगरपालिकेने दखल ...
नागपूर : मंगळवारी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी आपच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. पाच दिवसांपासून आंदोलन सुरू असूनही अद्याप महानगरपालिकेने दखल घेतलेली नाही.
ऑगस्ट क्रांती दिनापासून स्थानिक नागरिकांसह आपने साई मंदिर नवी मंगळवारी तलाव येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. रोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळात स्थानिक ५ नागरिक साखळी उपोषणाला बसतात. त्यानंतर रोज सायंकाळी ५ वाजेनंतर सतरंजीपुरा झोनच्या सहायक आयुक्तांना निवेदन दिले जाते. मात्र, मनपा प्रशासनाने दखल घेतलेली नाही.
उत्तर नागपूर प्रभाग पाचअंतर्गत नवी मंगळवारी भागात सुमारे ३०० वर्षे जुना तलाव असून, गेल्या २० ते ३० वर्षांपासून हा तलाव दुर्गंधीयुक्त व रोगराईस आमंत्रण देत आहे. अतिक्रमणामुळे आणि यात गडर लाइनचे पाणी, घाण आणि कचरा व निर्माल्य यामुळे तलाव दूषित झाला आहे. त्यामुळे तलाव सौंदर्यीकरण व स्वच्छतेच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. १५ ऑगस्टला सकाळी ११ वाजता प्रभागात सायकल रॅली काढून यासाठी जनजागृती केली जाईल. मनपाकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास बेमुदत उपोषणाचे आमरण उपोषणात रूपांतर केले जाईल, अशी माहिती विजय नंदनवार यांनी दिली.